स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, कुरुंदवाडमध्ये कारखाना कार्यालयास ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:36 PM2019-01-12T12:36:54+5:302019-01-12T12:38:57+5:30
उसाची पहिली उचल केवळ २३00 रुपयेच जमा केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन तीव्र केले असून कुरूंदवाड येथील साखर कारखान्याच्या गेटकेन कार्यालयास स्वाभिमानीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शनिवारी टाळे ठोकले.
कुरुंदवाड/कोल्हापूर : उसाची पहिली उचल केवळ २३00 रुपयेच जमा केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन तीव्र केले असून कुरूंदवाड येथील साखर कारखान्याच्या गेटकेन कार्यालयास स्वाभिमानीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शनिवारी टाळे ठोकले.
साखर कारखान्यांनी पहिली उचल २३00 रुपये दिल्याच्या निषेधार्थ संतप्त स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी कुरुंदवाडमधील सर्वच साखर कारखान्यांच्या विभागीय कार्यालयांना टाळे ठोकून आंदोलन केले. यावेळी आंदोलक कार्यकर्ते आणि कार्यालयातील कर्मचारी यांच्यात वादावादी झाल्यामुळे काहीकाळ त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
साखर कारखाने सुरू होऊन दोन महिने झाले तरीही अद्याप एकाही साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम जमा केली नव्हती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या एफआरपीमध्ये मोडतोड केल्यास तीव्र आंदोलन करू असा गर्भित इशारा दिला होता.
कोल्हापूर जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर २३00 रुपये वर्ग केल्याचे समजताच शेतकरी वर्गात तीव्र संतापाची तीव्र लाट उसळली आहे. याचाच परिणाम म्हणून आज कुरूंदवाड येथील साखर कारखान्यांच्या गेटकेन कार्यालयाला कार्यकर्त्यांनी टाळे ठोकून आंदोलन सुरु केले आहे.
दरम्यान, आजच कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची नांदणी येथे तातडीची बैठक बोलावून पुढे आंदोलनाची दिशा ठरणार असून खासदार राजू शेट्टी या बैठकीस मार्गदर्शन करणार आहेत. स्वाभिमानीची ताकद दाखवून देऊ असा इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिला आहे.