महाविकास आघाडीतून ‘स्वाभिमानी’ बाहेर पडणार? राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत होणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 01:53 PM2022-03-19T13:53:04+5:302022-03-19T13:53:38+5:30

आघाडीमध्ये सामावून घेताना ‘स्वाभिमानी’ला दिलेले शब्द पाळले नाहीत. त्याचबरोबर शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांबाबत निर्णय घेताना संघटनेला विचारात घेतले जात नाही, असा नाराजीचा सूर गेले वर्षभर संघटनेच्या नेत्यांचा आहे.

Swabhimani Shetkari Sanghatana is preparing to exit the Mahavikas Aghadi in the state | महाविकास आघाडीतून ‘स्वाभिमानी’ बाहेर पडणार? राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत होणार निर्णय

महाविकास आघाडीतून ‘स्वाभिमानी’ बाहेर पडणार? राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत होणार निर्णय

googlenewsNext

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यातील महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. याबाबत संघटनेने ५ एप्रिलला कोल्हापुरात राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. यामध्ये बाहेर पडण्याचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

आघाडीमध्ये सामावून घेताना ‘स्वाभिमानी’ला दिलेले शब्द पाळले नाहीत. त्याचबरोबर शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांबाबत निर्णय घेताना संघटनेला विचारात घेतले जात नाही, असा नाराजीचा सूर गेले वर्षभर संघटनेच्या नेत्यांचा आहे. त्यातच विधान परिषदेवर संधी देण्याचे आश्वासन राज्यपालांच्या खोड्यामुळे पाळले गेले नसल्याने अस्वस्थता वाढत आहे.

महावितरणविरोधातील आंदोलनात राज्य सरकारने फारशी दखल घेतली नाही, चौदा दिवस ठिय्या दिल्यानंतर चर्चेला बोलावले. यातून संघटना पदाधिकाऱ्यांच्या मनात राग आहे. या सगळ्या गोेष्टींची चर्चा करण्यासाठी ५ एप्रिलला शाहू मार्केट यार्ड येथील शेतकरी भवनमध्ये संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित केली आहे. एकूणच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मानसिकता पाहता आघाडीशी काडीमोड घ्यावी, असा सूर दिसत आहे.

बारावे घातलेल्या सरकारसोबत रहायचे का?

शेतीपंपांच्या वीजबिल व दिवसा वीजपुरवठा यासाठी महावितरणच्या दारात १४ दिवस आंदोलन केले. तिथे राज्य सरकारचे बारावेही ‘स्वाभिमानी’ने घातले. त्यामुळे बारावे घातलेल्या सरकारसोबत पुन्हा रहायचे का, असा प्रश्नही काही पदाधिकारी करत आहेत.

सांगली बँकेत सर्वपक्षीयांचा चुना लावण्याचा प्रयत्न

सांगली जिल्हा बँकेत सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येत दीडशे कोटींचा चुना लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक लाभ भाजपच्या जिल्हाध्यक्षांना होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांचा पुढाकार आहे. विधिमंडळात एकमेकांचे वस्त्रहरण करायचे आणि जिल्ह्यात गळ्यात गळे घालण्याचे काम आहे, हे सगळे जनता उघड्या डोळ्यांनी बघत असल्याची टीका शेट्टी यांनी केली.

आम्ही रस्त्यावर उतरून उत्तर देतो. आमच्या भूमिकेमुळे सरकारच्या स्थैर्यावर परिणाम होणार नाही, हे जरी खरे असले तरी हे सरकार ‘स्वाभिमानी’ने अनेक वर्षे कमावलेल्या नैतिकतेवर उभा आहे. आमदारकीबाबत यापूर्वीच सांगितले आहे, सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ. - राजू शेट्टी (नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना)

Web Title: Swabhimani Shetkari Sanghatana is preparing to exit the Mahavikas Aghadi in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.