स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थानिक आघाडीबरोबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:20 AM2020-12-26T04:20:58+5:302020-12-26T04:20:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क हेरले : हातकणंगले तालुक्यातील होणाऱ्या २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थानिक आघाडीबरोबर सहभागी होणार, अशी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
हेरले : हातकणंगले तालुक्यातील होणाऱ्या २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थानिक आघाडीबरोबर सहभागी होणार, अशी भूमिका ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हातकणंगले तालुक्याचे नेते माजी सभापती राजेश पाटील यांनी स्पष्ट केली आहे. हातकणंगले तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ६२ गावांमध्ये संघटनांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची फळी मजबूत आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना स्थानिक आघाडीमध्ये स्थान देऊन त्यांनाही सत्तेच्या वाट्यात सहभाग करून घेतल्यास पूर्ण ताकदीनिशी स्थानिक आघाडीच्या पाठीशी राहून ग्रामपंचायतीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी स्थानिक अघाडीचा झेंडा फडकविण्याचा निर्धार माजी सभापती राजेश पाटील यांनी केला आहे. हातकणंगले तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींपैकी २१ गावांतील ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने २०२० ते २०२५ या कालावधीसाठी ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये हालोंडी, तासगाव, मिणचे, नेज, बिरदेववाडी, दुर्गेवाडी, किणी, मनपाडळे, माणगाववाडी, जंगमवाडी, वठार तर्फ वडगाव, कुंभोज, कबनूर, माणगाव, चंदूर, लाटवडे, पाडळी, खोची, रुई, वठार तर्फ उदगाव, तिळवणी आदी गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मजबूत संघटन आहे. या गावांमध्ये स्थानिक गाव विकास आघाडीमध्ये संघटनेच्या कार्यकर्त्यांना संधी दिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गावविकास आघाडीस स्वाभिमानीचा पूर्ण पाठिंबा राहील, असे पत्रक माजी सभापती राजेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिले आहे.