Kolhapur: एफआरपी अधिक १०० रुपयेसाठी दालमिया कारखान्यावर 'स्वाभिमानी'चे ठिया आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 03:41 PM2023-12-05T15:41:53+5:302023-12-05T15:46:55+5:30
सरदार चौगुले पोर्ले तर्फ ठाणे : आसुर्ले-पोर्ले (ता.पन्हाळा) येथील दत्त (दालमिया भारत शुगर) कारखाना कार्यस्थळावर एफआरपी अधिक १०० रूपयेच्या ...
सरदार चौगुले
पोर्ले तर्फ ठाणे : आसुर्ले-पोर्ले (ता.पन्हाळा) येथील दत्त (दालमिया भारत शुगर) कारखाना कार्यस्थळावर एफआरपी अधिक १०० रूपयेच्या मागणीसाठी काटा बंद ठिया आंदोलन सुरू केले आहे. संघटनेच अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दरासाठी आक्रमक झाले आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यलयात दालमिया प्रशासनाचे अधिकारी आणि संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, जिल्हाध्यक्ष सागर शंभूशेटे यांच्यात ऊस दरा संदर्भात झालेली बैठक निष्पळ ठरली असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. कारखाना कार्यस्थळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मंगळवारी सकाळी दत्त दालमिया कारखान्याच्या गेटसमोर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जमावाने कारखान्याचा काट बंद करण्यासाठी आगेकुच केली. काटा गेटवर पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखून धरल्यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले होते. त्यामुळे काटा गेटसमोरच राजू शेट्टी यांच्यासह शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू ठेवले आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्यावर चूल पेटवून जेवणाची तयारी सुरू केली आहे.
चालू हंगामात दालमिया प्रशासनाने प्रतिटन ३२०० रुपये पहिली उचल जाहीर केली आहे. यंदाची रिकव्हरी ३२८४ रुपये बसत असल्याने शेतकऱ्यांना ३२०० रुपये ऊस दर अमान्य आहे. दालमिया प्रशासन एफआरपी अधिक १०० रूपये दर जाहीर करत नाही तोपर्यंत कारखान्यावरून हलणार नसल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. याप्रसंगी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.