‘स्वाभिमानी’ कोणाच्या मागे लागणार नाही
By admin | Published: January 23, 2017 01:20 AM2017-01-23T01:20:29+5:302017-01-23T01:20:29+5:30
राजू शेट्टी : उदगाव येथे ‘स्वाभिमानी’चा मेळावा; कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांची उपस्थिती
जयसिंगपूर : भाजपने सांगली, कोल्हापूर जिल्हे वगळता आम्हाला कोणत्याही जिल्ह्यात युतीबाबतची विचारणा केली नाही. आम्ही कोणाच्या मागे लागणार नाही. त्यामुळे आगामी लोकसभेत पराभूत झालो तरी चालेल, पण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना निवडून आणू, अशी ग्वाही खासदार राजू शेट्टी यांनी दिली. शेट्टी यांच्या या विधानामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा परिषद निवडणुकीत स्वबळावर लढणार, असा संकेत मिळत आहे.
उदगाव (ता. शिरोळ) येथील कल्पवृक्ष सभागृहात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी पार पडला. यावेळी खासदार राजू शेट्टी बोलत होते.
खासदार शेट्टीे म्हणाले, विजयाचे गणित जमविण्यासाठी आम्ही कसोसीने प्रयत्न करणार असल्याने या निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळणार आहे. २३ फेबुु्रवारीला निवडणुकीचा निकाल लागणार असून, स्वाभिमानीच्या विजयी उमेदवारांनी कपाळाचा गुलाल पुसून कर्जमुक्तीसाठीच्या आंदोलनात सहभागी व्हायचे आहे. वर्षाच्या आत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी स्वाभिमानी लढणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा तालुका वगळता सर्व जागा संघटनेच्या वतीने लढविल्या जातील. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षाने केलेल्या युतीमुळे कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसून, स्वाभिमानीच किंगमेकर ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सावकर मादनाईक म्हणाले, सध्या गावागावांत निवडणुकीचा आढावा घेत असून, शिरोळ तालुक्याचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. चांगल्या कार्यकर्त्यांना निवडून देण्यासाठी खासदार राजू शेट्टी जो निर्णय घेतील तो आम्हा शेतकऱ्यांना मान्य आहे. त्यामुळे या निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळेल. स्वागत आदिनाथ हेमगिरे, तर प्रास्ताविक आण्णासाहेब चौगुले यांनी केले. यावेळी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी सागर शंभूशेटे, बाजीराव देवाळकर, शहाजी पाटील, गोवर्धन दबडे, विक्रम पाटील, राजेंद्र गड्याण्णावर, राजाराम देसाई, संजय पाटील, शिवाजी माने, वसंत हजारे, विठ्ठल मोरे, संतोष पाटील, गुरू रिसगूड, जालिंदर ठोमके, विकास पाटील, शैलेश चौगुले, बंडु पाटील, मिलिंद साखरपे, एकनाथ जठार, अजित पवार, सीमा पाटील, सुवर्णा अपराज, अनंतमती पाटील, स्वाती पाटील, सुनंदा दानोळे, दीपाली ठोमके, प्रमिला पाटील, सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मी ‘स्वाभिमानी’चाच
यावेळी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, मी भाजपमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. पण मी भाजपबरोबर सरकारमध्ये आहे. पण मी स्वाभिमानीचाच कार्यकर्ता आहे. त्यामुळे खासदार राजू शेट्टी व माझी राम-लक्ष्मणाची जोडी तुटणार नसल्याचे खोत यांनी स्पष्ट करून विरोधकांच्या अफवावर विश्वास ठेवू नये, असे कार्यकर्त्यांना सांगितले. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी जिल्ह्याचा दौरा सुरू असून, स्वाभिमानीला या निवडणुकीत चांगले यश मिळणार आहे.