‘स्वाभिमानी’ची लग्नाआधीच घटस्फोटाची तयारी-शेट्टी, तूपकर यांची रात्रभर मॅरेथॉन चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:55 AM2019-02-24T00:55:06+5:302019-02-24T00:55:51+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटना कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस या मित्र पक्षांसोबत लग्नाआधीच घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहे. याबाबत शुक्रवारी रात्रभर कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये खासदार राजू शेट्टी, संघटनेचे राज्याध्यक्ष रविकांत तूपकर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटना कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस या मित्र पक्षांसोबत लग्नाआधीच घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहे. याबाबत शुक्रवारी रात्रभर कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये खासदार राजू शेट्टी, संघटनेचे राज्याध्यक्ष रविकांत तूपकर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन आघाडीसोबत काडीमोड घेण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. गुरुवारी (दि. २८) पुण्यात होणाºया राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत स्वबळाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
‘स्वाभिमानी’ने भाजपशी फारकत घेत कॉँग्रेस, राष्टÑवादीशी जुळवून घेण्यास सुरुवात केली. दोन्ही कॉँग्रेसच्या आघाडीत ‘स्वाभिमानी’ने सहभागी व्हावे, यासाठी दोन्ही कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर एकमत झाले. त्यानुसार ‘स्वाभिमानी’ला हातकणंगलेची जागा सोडून त्यांची उर्वरित मतदारसंघात मदत घेण्याचा निर्णय झाला. पण ‘स्वाभिमानी’ने बुलडाणा व वर्ध्याच्या जागेवरही दावा केल्याने पेच निर्माण झाला. या दोन्ही जागा कॉँग्रेसकडे आहेत. ‘स्वाभिमानी’ला रविकांत तूपकर यांच्यासाठी ‘बुलडाणा’, तर माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांच्यासाठी ‘वर्धा’ हवा आहे.
याबाबत, शुक्रवारी रात्री पाच तास कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये शेट्टी, तूपकर यांच्यासह प्रमुख पदाधिकाºयांची बैठक झाली. यामध्ये तीन जागा मिळत नसतील तर दोन्ही कॉँग्रेससोबत फरफटत जाऊ नये, यावर एकमत झाले. गुरुवारी पुण्यातील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत स्वबळावर लढण्याची घोषणा करून किमान नऊ जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी ‘स्वाभिमानी’ने केली आहे.
स्वाभिमानी येथे लढणार
हातकणंगले, कोल्हापूर, बुलडाणा, वर्धा, शिर्डी, माढा, सांगली, नाशिक, बारामती.
ताकही फुंकून पिण्याची वेळ
सदाभाऊ खोत बाहेर पडल्याने तूपकर हे राज्य पातळीवरील एकमेव आक्रमक शिलेदार संघटनेत राहिले आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी कोणत्याही परिस्थितीत राजू शेट्टी यांना बुलडाणा घ्यावाच लागणार आहे. ‘हातकणंगले’साठी दोन्ही जागा सोडल्या, तर संघटनेत वेगळा संदेश जाईल. त्यामुळे आता शेट्टींना ताकही फुंकूनच प्यावे लागणार आहे.
हातकणंगलेची जागा देण्याची तयारी दर्शवून दोन्ही कॉँग्रेसनी उपकार केले नाहीत. तिथे आमचा खासदार आहेच, बुलडाणा आणि वर्धा देत नसतील तर काडीमोड घ्या, अशी मानसिकता चळवळीतील कार्यकर्त्यांची आहे. याबाबत अंतिम निर्णय गुरुवारच्या कार्यकारिणी बैठकीत होईल.
- प्रा. जालंदर पाटील, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी पक्ष