"स्वाभिमानी"चे मंगळवारी दूध बंद आंदोलन, ५ रुपये अनुदानाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 12:22 PM2020-07-18T12:22:34+5:302020-07-18T12:26:15+5:30
दुधाचे दर पडल्यामुळे राज्यातील शेतकरी अक्षरशः मेटाकुटीस आला आहे. दुधाला प्रतिलिटर ५ रूपयेचे तातडीचे अनुदान द्या, मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी ( २१) एक दिवसाचे राज्यव्यापी लाक्षणिक दूध बंद आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारने दूध दरामध्ये तातडीने हस्तक्षेप करावे अन्यथा लॉकडाऊन मोडून बेमुदत दूध बंद आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.
कोल्हापूर ः दुधाचे दर पडल्यामुळे राज्यातील शेतकरी अक्षरशः मेटाकुटीस आला आहे. दुधाला प्रतिलिटर ५ रूपयेचे तातडीचे अनुदान द्या, मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी ( २१) एक दिवसाचे राज्यव्यापी लाक्षणिक दूध बंद आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारने दूध दरामध्ये तातडीने हस्तक्षेप करावे अन्यथा लॉकडाऊन मोडून बेमुदत दूध बंद आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.
आज फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील शेतकर्यांशी संवाद साधला. घटलेल्या दुधाच्या दराबद्दल आपली भूमिका मांडली. यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाने राज्यातील दूध व्यवसायावर संक्रात आलेली आहे. लॉकडाऊनमुळे हॉटेल, आईस्क्रिम, मॉल, विवाह सोहळे आदी बंद झाले आहेत. याचा विपरीत परिणाम दुधाच्या खपावर झालेला आहे. राज्यात दररोजचे दूध उत्पादन ११९ लाख लिटर आहे. ५२ लाख लिटर हे अतिरिक्त झाले आहे. तसेच दूध पावडरचा दर ३३० रूपयांवरून १६० रूपयावर आलेला आहे. कोरोनामळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चीन, युरोप व आफ्रिका या देशातील निर्यात बंद झाले आहे.
देशात सध्या दीड लाख टन दूध पावडर शिल्लक असून राज्यात देखील ५० हजार टन दूध पावडर शिल्लक आहे. तरीही केंद्र सरकारने १० हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेऊन दूध उत्पादकांना देशोधडीस लावण्याचे पाप करत आहेत. तसेच बटरचा दर ३४० रूपयावरून २२० रूपये झाले आहे.याचा परिणाम दूध खरेदीवर झाला असून अनेक संघ १७ ते २० रूपये लिटरने गायीच्या दुधाची खरेदी करत आहेत.
दूध उत्पादक शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. मंगळवारी, शेतकर्यांनी गावातील ग्रामदैवताला प्रतिकात्मक अभिषेक घालून आपलं दूध घरातच ठेवावे. तसेच गोरगरीबांना दुधाचे वाटप करावे. असे आवाहन करत हे एक दिवसाचे दूध बंद आंदोलन करून सरकारला हा निर्वाणीचा इशारा द्यायचा आहे. यावर केंद्र व राज्य सरकारने आमचे ऐकलं तर ठीक अन्यथा कोणत्याही क्षणी बेमुदत दूध बंद आंदोलन करू, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला
या आहेत मागण्या ः
- राज्य सरकारने प्रतिलिटर दुधास ५ रूपयांचे अनुदान द्यावे.
- केंद्र सरकारने ३० हजार टन दूध पावडरचा बफर स्टॉक करावा.
- दूध पावडर करीता प्रतिकिलो ५० रूपये अनुदान देण्यात यावे.
- दूध पावडर, बटर व तूप यावरील जीएसटी कमी करण्यात यावे.