स्वाभिमानीची सोमवारची ऊस परिषद ऑनलाईन : फेसबुकवरून होणार लाईव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 04:45 PM2020-10-30T16:45:10+5:302020-10-30T16:48:58+5:30
Swabimani Shetkari Sanghatna, collcatoroffice, kolhapurnews, farmar स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १९ वी ऊस परिषद सोमवारी (दि. २) जयसिंगपूर येथील कल्पवृक्ष गार्डन येथे दुपारी दोन वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर संघटनेने ही घोषणा केली.
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १९ वी ऊस परिषद सोमवारी (दि. २) जयसिंगपूर येथील कल्पवृक्ष गार्डन येथे दुपारी दोन वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर संघटनेने ही घोषणा केली.
गेली १९ वर्षे स्वाभिमानीच्या ऊस परिषदेतच उसाचा दर निश्चित केला होतो. त्यानंतर आंदोलन पेटते आणि तोडगा काढून साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होतो. ऊस परिषदेला हजारो शेतकरी जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावर एकत्र येतात. त्यांच्या साक्षीने ऊसदराचा आकडा जाहीर केला जातो.
यंदा कोरोनाचे संकट असल्याने ऊस परिषद होणार की नाही, याबाबत साशंकता होती तरीही स्वाभिमानी सोमवारी ऊस परिषदेची घोषणा केली. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी ऊस परिषदेबाबत विचार करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले होते. त्यानुसार शुक्रवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली स्वाभिमानी च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
त्यामध्ये, शिवसेनेने आपला पारंपरिक दसरा मेळावा ऑनलाईन घेतला. त्याप्रमाणेच ऊस परिषद घ्यावी, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी सुचविले. त्यानंतर स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांंच्याशी चर्चा केली आणि ऑनलाईन पद्धतीने परिषद घेण्याचे मान्य केले.
बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक, संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, अजित पोवार, वैभव कांबळे, विक्रम पाटील, जयकुमार कोल्हे, सागर आडके, विठ्ठल मोरे, सचिन शिंदे, एम. के. नाळे आदी उपस्थित होते.