स्वाभिमानी लोकसभेच्या सहा जागा लढवणार, प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालिंदर पाटील यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 07:38 PM2024-02-19T19:38:15+5:302024-02-19T19:38:50+5:30
राशिवडे : हातकणंगले लोकसभा मतदारसंघासह कोल्हापूर , सांगली, माढा, परभणी, बुलढाणा या लोकसभेच्या सहा जागा स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर ...
राशिवडे : हातकणंगले लोकसभा मतदारसंघासह कोल्हापूर, सांगली, माढा, परभणी, बुलढाणा या लोकसभेच्या सहा जागा स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढवणार असून प्रसंगी राज्यातील इतर जागांवर ही मतदारांसमोर सक्षम उमेदवार देण्याची तयारी आहे.
हातकणंगलेतून आमचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, सांगलीतुन जिल्हाध्यक्ष महेश खराडे तर मी स्वतः कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची माहीती स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालिंदर पाटील यांनी दिली. ते ६३ व्या वाढदिवसानिमित्त येथे झालेल्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष अजित पोवार, शेतकरी संघटना व पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आयुष्य वेचले. शेतकरी संघटनेने शेतकरी, कष्टकऱ्यांच्या घामाला दाम मिळवून दिले. या शिदोरी वरच आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. लोकांना आता स्वाभिमानी पक्ष विश्वासाचा वाटू लागला आहे. राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी सह सर्वच पक्षातील राजकारण्यांवरील जनतेची विश्वास आर्हता संपत चाललेली आहे. राज्यातील इतर पक्षातील अनेक नेते स्वाभिमानीच्या संपर्कात असल्याने आम्हालाही ऊर्जा निर्माण झाली आहे. परिणामी राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानीचे उमेदवार उभा करण्याची तयारी केली आहे. यावेळी रंगराव पाटील, रावसाहेब डोंगळे, रमाकांत तोडकर आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते .