विषाणूतील बदल अभ्यासण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून स्वॅब पुण्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:18 AM2021-06-26T04:18:20+5:302021-06-26T04:18:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर कोरोनाची दुसरी लाट अजूनही त्रासदायक ठरत असताना कोरोनाचा विषाणू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर कोरोनाची दुसरी लाट अजूनही त्रासदायक ठरत असताना कोरोनाचा विषाणू आपले स्वरूप बदलत आहे. डेल्टा प्लससारखे बदल धारण केलेले विषाणू आणखी घातक ठरू शकतात. म्हणूनच हा बदल अभ्यासण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून दर आठवड्याला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे स्वॅब पुण्याला पाठवण्यात येतात.
गेल्या मार्चमध्ये सुरू झालेली कोरोनाची लाट मध्यंतरी थांबून पुन्हा जोमाने सुरू आहे. हा विषाणू रूपांतरित होत असल्याने वैद्यकीय क्षेत्रापुढचे आव्हान वाढत चालले आहे. अशाच स्वरूप बदललेल्या आणि डेल्टा प्लस असे नाव देण्यात आलेल्या विषाणूमुळे केंद्र आणि राज्य सरकारची झोप उडाली आहे. त्यामुळेच पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत आणि राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र, पुणे या दोन प्रयोगशाळांमध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांतून पॉझिटिव्ह आलेल्या आठवड्यातील एकूण रुग्णांपैकी ५ टक्के रुग्णांचे स्वॅब पुण्याला पाठवण्यात येत आहेत.
गेल्या वर्षी अशा पद्धतीने फारशी फेरतपासणी होत नव्हती; परंतु हा विषाणू स्वरूप बदलत असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून अशा पद्धतीने स्वॅब संकलन करून पुण्याला पाठवण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय प्रयोगशाळांमधील आणि आवश्यकता वाटल्यास खासगी प्रयोगशाळेतील पाच टक्के स्वॅबचे संकलन करून ते पुण्याला पाठवण्यात येत आहेत. सुरुवातीला काही जिल्ह्यांतून स्वतंत्र वाहनाद्वारे, मधल्या टप्प्यात कुरिअरद्वारे हे स्वॅब पाठवण्यात येत आहेत.
या ठिकाणी या स्वॅबची तपासणी होऊन यातील कोरोना विषाणूने आपले स्वरूप बदलले आहे का, याचा अभ्यास केला जातो. ही निरंतर प्रक्रिया सुरू असतानाच जळगाव आणि रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांमध्ये डेल्टा प्लसची लक्षणे दिसल्याने तातडीने ही बाब दिल्लीतील राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राला कळवण्यात आली. यानंतर केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने याची घोषणा करून दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
चौकट
कोल्हापुरात येते पुण्याहून गाडी
या स्वॅबच्या संकलनासाठी आता पुण्याहूनच प्रयोगशाळांचे वाहन कोल्हापुरात दर शुक्रवारी येत आहे. त्यानंतर शेंडा पार्क प्रयोगशाळा, डी. वाय. पाटील रुग्णालयातील प्रयोगशाळा अन्य दोन खासगी प्रयोगशाळा येथून हे स्वॅब घेऊन ही गाडी पुण्याला जाते.