Kolhapur: स्वामी समर्थ केंद्राचा ध्यास..पंचवीस हजार रुग्णांना भरवला घास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 01:59 PM2023-10-07T13:59:43+5:302023-10-07T14:01:10+5:30
जयसिंगपूरमधील मानवसेवा : महिला, सेवेकरी यांचा उत्स्फूर्त पुढाकार
संदीप बावचे
जयसिंगपूर (कोल्हापूर) : अन्नदान हेच श्रेष्ठदान या संकल्पनेतून येथील स्वामी समर्थ केंद्राकडून रुग्णांना मोफत जेवणाचे डबे देण्याचा उपक्रम सुरू आहे. शहरातील सर्व रुग्णालयांतील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना हे प्रेमाचे दोन घास दिले जात आहेत. गेल्या तीन महिन्यांत २५ हजारजणांना या सेवेचा लाभ झाला आहे. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयासह (सीपीआर) अनेक शहरांत असा उपक्रम सुरू होण्याची गरज आहे.
येथील गल्ली क्रमांक पाचमधील स्वामी समर्थ केंद्र अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवते. त्यांना रुग्ण व त्याच्या सेवेसाठीच्या लोकांची जेवणासाठी आबाळ होत असल्याचे लक्षात आले. त्यांनी केंद्रातर्फे त्यांना डबे पुरवण्याचा निर्णय घेतला. शहरात २० हून अधिक खासगी रुग्णालय व एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. उपचार घेण्यासाठी कर्नाटक सीमाभाग, शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील रुग्ण येतात. मात्र, घरी जाऊन डबा घेऊन येणे अशक्य असते.
त्यांना १५ जूनपासून डबे सुरू करण्यात आले. त्यामुळे परगावाहून आलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना गावाकडे जाऊन जेवणाचे डबे आणण्यासाठी धावाधाव करावी लागत नाही. त्यांचा आर्थिक खर्चही होत नाही. संकटाच्या काळात 'स्वामी'च आमच्यासाठी धावून येतात आणि अन्न पुरवितात, अशी रुग्णांची भावना बनली आहे.
स्वयंसेवकांकडून सामाजिक बांधीलकी
डबा पोहोच करण्यासाठी सध्या तरुण कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून मोठ्या संख्येने पुढे आले आहेत. स्वामींचा विचार लोकांच्या मुखात घास गेला पाहिजे, या भावनेतून डबे पोहोच करण्यासाठी तरुणांची साखळी निर्माण होत आहे. शहरात वेगवेगळी तरुण मंडळे, सेवाभावी संस्था, महिला मंडळे आहेत. या सर्वांनी ठरविले तर नक्कीच हा उपक्रम दीर्घकाळ चालू शकतो. ही सेवा सुलभ व्हावी म्हणून एका व्यक्तीने इलेक्ट्रिक गाडीही उपलब्ध करून दिली आहे.
सेवा कशी चालते..
सर्व रुग्णालयात अन्नछत्र केंद्राच्या टोल फ्री क्रमांकाच्या पाट्या लावल्या आहेत. त्यावर फोन केला की, रोज दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी साडेसात वाजता दवाखान्यात डबा पोहोच केला जातो.
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असे मानून समाजाच्या मदतीतूनच हा उपक्रम सुरू आहे. त्यास समाजाचे पाठबळ मोठे आहे. -वैजनाथ राऊत, सेवेकरी