जुन्या जखमा विसरलो नाही; संभाजीराजे लोकसभेच्या रिंगणात उतरणार
By समीर देशपांडे | Published: January 6, 2024 04:33 PM2024-01-06T16:33:16+5:302024-01-06T16:35:25+5:30
विधानसभाच नाही तर लोकसभेच्याही रिंगणात, संभाजीराजेंनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग
कोल्हापूर : लोकसभेच्या २००९ च्या निवडणुकीमध्ये ज्या जखमा झाल्या आहेत. त्या जुन्या जखमा आम्ही अजून विसरलेलो नाही. वेळ आल्यावर तुम्हाला दिसूनच येईल. त्यामुळे आता केवळ विधानसभा नाही तर लोकसभेच्या रिंगणातही ‘स्वराज्य संघटना’ उतरणार असल्याचे माजी खासदार संभाजीराजे यांनी आज, शनिवारी कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
संभाजीराजे म्हणाले, लोकसभेचे वातावरण तापायला लागलंय म्हणूनच तुम्ही हा प्रश्न विचारत आहात हे मला माहिती आहे. पूर्वी आम्ही केवळ विधानसभेचे उद्दिष्ट ठेवले होते. परंतू अनेकांकडून आता लोकसभेसाठीही विचारणा होत आहे. त्यामुळे ‘स्वराज्य’ संघटना लोकसभेलाही निवडणूक रिंगणात उतरणार आहे.
कोणत्याही नेते, कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षण विषयावर बोलताना विचार करून बोलावे. कोणत्याही जाती धर्माचा अवमान होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. किल्ले पन्हाळगडाजवळील पावनगडावरील नवीन प्रार्थनास्थळ जमीनदोस्त करण्यात आले. याबाबत विचारले असता ते म्हणाले, कोणत्याही किल्ल्यावर अशा कोणत्याही नवीन बाबी होवू नयेत. उलट जे जे इतिहासकालीन आहे. त्याची जपणूक मात्र व्हावी.