गोड, पौष्टिक ‘हनुमान’ फळाची बाजारात भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:29 AM2018-10-22T00:29:33+5:302018-10-22T00:29:40+5:30
कोल्हापूर : फळबाजारात ‘हनुमान’ फळाची आवक झाली असून, हे ‘गोड’ फळ ग्राहकांना भुरळ पाडत आहे. किरकोळ बाजारात त्याचा ७० ...
कोल्हापूर : फळबाजारात ‘हनुमान’ फळाची आवक झाली असून, हे ‘गोड’ फळ ग्राहकांना भुरळ पाडत आहे. किरकोळ बाजारात त्याचा ७० रुपये किलो दर असून, इतर फळांचे दर स्थिर आहेत. ‘मेथी’, ‘कोथिंबीर’ची आवक मंदावली व मागणी वाढल्याने दर तेजीत आहे. किरकोळ बाजारात १५ रुपये मेथी, तर ३0 रुपये कोथिंबिरीची पेंढी आहे. तुलनेने ‘पोकळ्या’चे दर स्थिर असून, डाळीच्या दरात मात्र काहीशी वाढ होत आहे.
दसरा संपल्याने फळबाजारात थोडीशी शांतता आहे. सफरचंद, संत्री, चिक्कू, पेरू, सीताफळ, डाळिंबांची आवक व मागणी सारखी असल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही. बोरांची आवक सुरू झाली असून, घाऊक बाजारात सरासरी २0 रुपये किलो दर आहे. ‘हनुमान’फळांची आवक सुरू झाली असून, दिसायला सीताफळासारखे असणारे हे फळ एकदम गोड असते. या फळात ‘बी’ कमी व गर जास्त असल्याने ग्राहकांच्या ते पसंतीस पडत आहे.
भाजीपाला बाजारात तो चढउतार दिसत नसली तरी ओली मिरची, ओला वाटाणा, वरणाच्या दरात गेल्या आठवड्यापेक्षा वाढ झाली आहे. ओल्या वाटाण्याची आवक स्थिर असली तरी मागणी वाढल्याने घाऊक बाजारात ७५ रुपये किलोपर्यंत दर पोहोचला आहे. टोमॅटोची आवक स्थिर असल्याने दर सरासरी सात रुपयांवर कायम राहिला आहे. कोबी, वांगी, गवार, कारली, भेंडी, दोडका या प्रमुख भाज्यांचे दर स्थिर आहेत. मेथी, पालकचे दर चढेच आहेत. किरकोळ बाजारात १५ रुपये पेंढी आहे. तुलनेने पोकळ्याची पेंढी १0 रुपये आहे. कोथिंबिरीचा दर ३0 रुपये पेंढी झाला असून, पाच रुपयांना कोथिंबिरीच्या पाच काड्याच हातात येत आहेत.
दिवाळी १५ दिवसांवर आल्याने कडधान्य बाजार सज्ज दिसतो. ऐन दिवाळीच्या तोंडावर डाळींच्या दरात हळूहळू वाढ होत आहे. तूरडाळ ७२, मूगडाळ ८०, हरभरा डाळ ६५ रुपये दर आहे. साखरेच्या दरात चढउतार नसून किरकोळ बाजारात मात्र ३६ रुपये किलो दर राहिला आहे. शेंगदाणा, मैदा, पोहे, रवा, गूळ, शाबूदाणाचे दर मात्र तुलनेने स्थिर आहेत.
कांदा वधारला
गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात कांदा सरासरी १० रुपये किलो होता. या आठवड्यात कांदा सरासरी १४ रुपयांपर्यंत गेला आहे. लसणाच्या दरातही थोडी वाढ झाली असून, प्रतिकिलो २५ रुपये, पण बटाट्याचे दर स्थिर आहेत.