गोड बोलण्याने कटुता नष्ट होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 01:17 AM2019-01-21T01:17:42+5:302019-01-21T01:17:46+5:30
गोड बोलण्याने कटुता नष्ट होते व सुसंवाद ठेवल्याने समोरच्याचे मन जिंकता येते या सूत्रानेच आपण काम करत आहे. याचा ...
गोड बोलण्याने कटुता नष्ट होते व सुसंवाद ठेवल्याने समोरच्याचे मन जिंकता येते या सूत्रानेच आपण काम करत आहे. याचा आतापर्यंतच्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये तोट्यापेक्षा फायदाच अधिक झाला आहे. गोड बोलूनही लोकांची कामे होतात या मताचे आपण आहोत. अनेकवेळा शासकीय अधिकारी व जनता यामध्ये होणारे वाद हे सुसंवाद नीट न झाल्यानेच होतात. त्यासाठी समोरच्याशी चांगल्या पद्धतीने व्यवहार आणि संवाद होणे गरजेचा आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रार ऐकली तरी लोकांना समाधान वाटते; त्यामुळे संबंधिताला त्याची बाजू मांडायला देणे, त्याचे शांतपणे ऐकून घेणे, खरोखरंच अन्याय झाला असेल तर त्यात स्वत: लक्ष घालून काम करणे, अशा पद्धतीने काम सुरू आहे. खालच्या पातळीवर न्याय न मिळाल्यानेच एखादा त्रस्त नागरिक आपल्याकडे तक्रार घेऊन येतो; त्यामुळे अशा प्रकरणांसाठी पर्सनल अटेंशन रजिस्टर (पीएआर) अशी वर्गवारी करण्यात आली आहे. यामध्ये आपण स्वत: वैयक्तिक लक्ष घालून आलेल्या तक्रारींबाबत संबंधित विभागाला कळवून त्याबाबत दर आठवड्याला होणाºया विभागप्रमुखांच्या बैठकीत आढावा घेतला जातो.
आपल्याकडे आंदोलनाच्या निमित्ताने भेटायला येणाºया शिष्टमंडळांचा विचार करता, त्यांना खालच्या स्तरावरील प्रशासकीय यंत्रणेकडून न्याय मिळालेला नसतो व त्यांची बाजू योग्यप्रकारे ऐकून घेतलेली नसते. शेवटचा पर्याय म्हणून ते माझ्याकडे येत असतात. त्यामुळे त्या लोकांशी गोड बोलून शांतपणे ऐकून घेतल्यावर त्यांच्यामध्येही समाधानाचे व विश्वासाचे वातावरण निर्माण होते. आंदोलकांची बाजू प्रेमाने ऐकून घेऊन त्यांची सोडवणूक केल्यास ते समाधानाने परत जातात. तसेच एखादे काम हे नियमानुसार होत नसेल हे शांतपणे पटवून दिल्यास संबंधितालाही ते पटत. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ व शिवाजी पूल या ज्वलंत प्रश्नांवरील आंदोलनासंदर्भात वेळोवेळी भेटायला आलेल्या शिष्टमंडळाची भूमिका शांतपणे ऐकून घेऊन त्यांच्याशी गोड बोलून सुसंवाद ठेवला; त्यामुळे यातून चांगल्या पद्धतीने मार्ग निघून अंबाबाई मंदिर पुजाºयांचा कायदा झाला, तर शिवाजी पुलाचे काम सुरू होऊन ते महिन्याभरात पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
- अविनाश सुभेदार,
जिल्हाधिकारी