गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:42 AM2019-01-29T00:42:13+5:302019-01-29T00:42:18+5:30

भारत चव्हाण आपल्या हिंदू धर्मातील सण, उत्सवातून अनेक चांगले संदेश दिले गेले आहेत. त्यातून सामाजिक सलोखा, एकात्मता, बंधुभाव, एकमेकांबद्दल ...

Sweetness | गोडवा

गोडवा

Next

भारत चव्हाण
आपल्या हिंदू धर्मातील सण, उत्सवातून अनेक चांगले संदेश दिले गेले आहेत. त्यातून सामाजिक सलोखा, एकात्मता, बंधुभाव, एकमेकांबद्दल आदर व्यक्त करणे आणि त्याद्वारे सामाजिक, कौटुंबिक जबाबदारी निभावणे यासारखे संदेश अशा सण, उत्सवातून दिले आहेत. त्याचे अनुकरण आपण आजही करीत आहोत. नवीन वर्षाची सुरुवात झाल्यानंतर संक्रांतीचा सण नुकताच झाला. या सणात आपण एकमेकांना तिळगूळ देतो, गोड-गोड बोला म्हणून आवाहन करतो. वर्षभराची आपली वर्तणूक कशी असते, हा वादाचा मुद्दा असला तरी सणाच्या निमित्ताने का होईना आपण गोड बोलण्याचे आर्जव करतो. नुसत्या गोड बोलण्याने दोन व्यक्तीत किती ऊर्जा निर्माण होते. समाज जोडण्यास किती मदत होऊ शकते, हे बोलण्यातून समोर येते.
समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या वर्तणुकीवर त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब पाहायला मिळते. व्यक्तीचा निटनेटकेपणा, परिधान केलेले कपडे, त्यांच्यातील नम्रता, विनयशीलता आणि आज्ञाधारकपणा हा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा मुख्य गाभा असतो. त्यातही त्यांचे मधुर बोलणे आणि खरं बोलणे यावरदेखील बरेच काही अवलंबून असते. तुमच्या वागण्यात टापटीपपणा आहे आणि बोलण्यात नम्रता, गोडवा नसेल, तर त्याला काही अर्थ राहत नाही. म्हणून तुम्ही कसे बोलता, किती चांगले बोलता, किती गोड बोलता हे फार महत्त्वाचे आहे. चांगल्या, मधुर बोलण्याने माणसांची मनं जोडली जातात. अशी अनेक मनं एकमेकांशी जोडली की, मग त्यातून एका सुसंस्कृत समाजाची निर्मिती होते. अशी निर्मिती राष्टÑाच्यादृष्टीने महत्त्वाची असते.
तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी तुम्ही रोज गोड बोलण्याचा प्रयत्न केला, तर त्यातून तुम्हाला खरा आनंद मिळतो आणि जगण्यातील उत्साहही वाढतो. तुमचा एक गोड शब्द केवळ व्यक्तीच नाही, तर संपूर्ण समाजमन जोडण्यास कारणीभूत ठरत असतो. कटू बोलण्याने जो तिरस्कार निर्माण होतो. मनात द्वेष तयार होतो. या द्वेषातून मनात विष तयार होते आणि एकदा का विष तयार झाले की मनातून बाहेर काढणे अवघड होऊन जाते. गोड बोलण्याने तिरस्काराची जागा प्रेम आणि आपुलकी घेते. समाजात तुमच्याबद्दल एक आदरभाव निर्माण होतो. म्हणूनच जीवनात सहवासातील प्रत्येक व्यक्तीशी गोड आणि चांगले बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आजकाल आपल्या आजूबाजूला व्यावसायिकता अधिक निर्माण झाली आहे. स्वार्थी वृत्तीही पाहायला मिळते. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने किंवा आपल्या ‘बॉस’ला चांगले वाटावे म्हणून काही व्यक्ती अतिशय गोड बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या बोलण्यात आपुलकीपेक्षा दिखावा जास्त असतो. त्यांच्या बोलण्यात खरेपणाचा अभाव असतो. काही व्यक्ती तर इतक्या गोड बोलतात की, समोरच्या व्यक्तीला किंवा ऐकणाºयांना त्याची कीव येते. ज्याच्या बोलण्यात प्रमाणापेक्षा अधिक गोडवा असतो त्यांच्यात विश्वासार्हता कमी असते. अशा व्यक्ती कधी कधी घातकही ठरतात. काही व्यक्तींचा स्वभाव शांत असतो. त्या कमी बोलत असतात. त्यांच्याबद्दल गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते. कमी बोलण्याचा हा धोका असतो. काही कमी स्पष्ट आणि परखड बोलणाºया असतात. साक्षात चिले महाराजच! जे पटत नाही त्यावर स्पष्टपणे आपले मत मांडणे हा अशा व्यक्तींचा स्वभाव असतो; पण आजकाल स्पष्ट बोललं की अनेकांना राग येतो. बोलणाºयाचे मन निखळ असतं, परंतु ज्यांना बोललं त्या व्यक्ती दूर जातात. म्हणूनच नि:स्वार्थी भावनेतून गोड आणि खरे बोलणे फार महत्त्वाचे असते. त्यातूनच तुमच्याबद्दलची विश्वासार्हता ठरते. माणसाच्या बोलण्यातील गोडवा साखरेपेक्षाही अधिक गोड असतो. हाच गोडवा जीवनात कायम टिकतो, तोच खºया अर्थाने त्या व्यक्तीची श्रीमंती असते.

Web Title: Sweetness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.