जलतरण तलाव आणखी महिनाभर लोंबकळतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:50 AM2018-08-29T00:50:55+5:302018-08-29T00:50:58+5:30
कोल्हापूर : येथील संभाजीनगरातील विभागीय क्रीडा संकुलातील रखडलेल्या जलतरण तलावाची ‘आयआयटी’च्या एका सदस्याने व्हिडिओ कॉलिंगद्वारे पाहणी केली. त्यातील पाणीसाठा व पावसामुळे चाचणीला ‘खो’ बसला. त्यामुळे तज्ज्ञांची समिती सप्टेंबर महिन्यात प्रत्यक्ष येऊन चाचणी घेणार आहे; त्यामुळे या जलतरण तलावाचा प्रश्न आणखी लोंबकळत पडला आहे. शूटिंग रेंजचे मात्र कोट्यवधीचे साहित्य दाखल झाले आहे.
गेल्या नऊ वर्षांपासून या क्रीडा संकुलातील फुटबॉल, ४०० मीटरचा धावनमार्ग, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो, फुटबॉल, टेबल टेनिस, आदी मैदाने तयार झाली; मात्र जलतरण तलावात पद्माळ्यातील सांडपाणी मिसळू लागल्याने हा तलाव बांधून तयार झाला तरी वापरात काही केल्या आला नाही. त्याच्या दुुरुस्तीकरिता विविध समित्या, तीन विभागीय आयुक्तांनी भेट देऊन पुन्हा समिती नेमली. अनेक वेळा चर्चेच्या फेरी झडल्या. अनेक क्रीडा अधिकाऱ्यांना कडक समजही दिली गेली. तरीही जलतरण तलावाचे घोंगडे भिजतच राहिले. अखेरीस नव्याने आलेले विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आयआयटीच्या तज्ज्ञांची मदत घेण्याचे जाहीर केले. त्यानुसार आयआयटीच्या एका सदस्याने दोन दिवसांपूर्वी व्हिडिओ कॉलिंगद्वारे नेमक्या दोषाची माहिती घेतली. त्यानुसार या जलतरण तलावातील पाणी पूर्ण काढून टाकण्याचे सांगितले. पाऊस कमी झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात पुन्हा आयआयटीची चार सदस्यीय समिती येथे येऊन पाहणी करणार आहे. त्यानंतर त्यावरील उपाययोजना सुचविल्या जाणार आहेत. त्यामुळे पुन्हा महिनाभर हे काम लांबणीवर पडले आहे.
नेमबाजीचे साहित्य
नेमबाजीसाठी लागणारे कोट्यवधी किमतीचे साहित्य दाखल झाले आहे. यात १०, २५ व ५० मीटर आॅटोमेटिक इलेक्ट्रॉनिक स्कोअरिंग टार्गेट, इलेक्ट्रॉनिक मॅनिअल टार्गेट, १० लिटरच्या मास्टर रायफल बॉटल्स अशा आवश्यक साधनांचा समावेश आहे.
स्वच्छतागृहासाठी कनेक्शन
पाणी कनेक्शन नसल्याने स्वच्छतागृहांचा वापरच होत नव्हता. म्हैसेकर यांच्या पाहणी दौºयात ही बाब निदर्शनास आली. तेव्हा तिथे महापालिका आयुक्तही उपस्थित होते; परंतु क्रीडा विभागाने महापालिकेला कनेक्शनसाठी अर्जच केला नाही, असे स्पष्ट झाले होते. त्यानंतर यंत्रणा जागी झाली व आता महापालिकेची दोन नळ कनेक्शन्स घेण्यात आली आहेत.