'राजाराम' बंधाऱ्यावर पोहण्यास बंदी, सापडल्यास कडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 05:29 PM2020-05-27T17:29:50+5:302020-05-27T17:42:36+5:30
कसबा बावडा (ता.करवीर ) येथील राजाराम बंधारा येथे व पंचगंगा नदीपात्रात करवीर पोलिसांनी पोहण्यास बंदी घातली आहे . नदीपात्रात पोहताना आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा करवीर पोलिसांनी दिला.
कसबा बावडा/कोल्हापूर : कसबा बावडा (ता.करवीर ) येथील राजाराम बंधारा येथे व पंचगंगा नदीपात्रात करवीर पोलिसांनी पोहण्यास बंदी घातली आहे. नदीपात्रात पोहताना आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा करवीर पोलिसांनी दिला.
राजाराम बंधारा येथे सकाळी ७ ते ९ व दुपारच्यावेळी पोहण्यासाठी दररोज सुमारे तीन-चारशे तरुणांची गर्दी असते. सध्या उन्हाचा कडाका प्रचंड वाढल्याने या गर्दीत आणखीन भर पडत आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये तसेच सोशल डिस्टन्ससिंग रहावे यासाठी आज बुधवारी करवीर पोलिसांनी राजाराम बंधारा येथे सकाळी पाहणी करून स्पीकरवरून सक्त सूचना दिल्या.
सध्या दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे नदीपात्रात कोणीही पोहण्यासाठी येऊ नये. पोहताना सापडल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला. हा इशारा मिळताच नदीपात्रात पोहत असलेल्या तरूण पटापटा बाहेर आले.
अवघ्या दहा मिनिटात राजाराम बंधारा निर्मनुष्य झाला. दरम्यान, kनदीपात्रात पोहण्यास पोलिसांनी बंदी घातल्याने तरुणाई आता पोहण्यासाठी विहिरीवर गर्दी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.