फायनान्सच्या कर्जदारांवर पुन्हा दंडाची टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 03:17 PM2020-07-24T15:17:16+5:302020-07-24T15:21:45+5:30
कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन सुरू केला आहे. यामध्ये बँकाही बंद ठेवल्या आहेत. परिणामी ज्यांनी फायनान्स कंपनीमधून कर्ज घेतले आहे, त्यांच्यावर पुन्हा दंडाची टांगती तलवार आहे. सहाशेपासून हजार रुपयेपर्यंत खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.
विनोद सावंत
कोल्हापूर : कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन सुरू केला आहे. यामध्ये बँकाही बंद ठेवल्या आहेत. परिणामी ज्यांनी फायनान्स कंपनीमधून कर्ज घेतले आहे, त्यांच्यावर पुन्हा दंडाची टांगती तलवार आहे. सहाशेपासून हजार रुपयेपर्यंत खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यामध्ये कोरोना कहर सुरू आहे. रोज दोनशेच्यावर नव्याने रुग्णांत भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने २० ते २६ जुलै कडक लॉकडाऊन केला आहे. केंद्र आणि राज्य शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये बँका सुरू होत्या. परंतु बँकेतील कर्मचारी कोरोनाबाधित सापडत आहेत. तसेच ग्राहकांची बंद दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता बँकेत गर्दी होते.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सात दिवस बँकाही बंद ठेवल्या आहेत. परिणामी ज्यांनी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले आहे, अशांना फटका बसत आहे. काहींकडून सहकारी, राष्ट्रीयीकृत बँकेमधून फायनान्सचे हप्ते ईसीएसच्या (इलेक्ट्रिक क्लिअरन्स सर्व्हिस) माध्यमातून जमा केले जातात.
कर्जाच्या तारखेच्या अगोदर एक दिवस खात्यावर पैशाची तजवीज केली जाते. मात्र, सध्या बँका बंद असल्याने अनेकांना पैसे जमा करता आले नाहीत. अशा बहुतांशी कर्जदारांना दंडाला सामोरे जावे लागणार आहे.
सहकारी, राष्ट्रीयीकृत बँकेतील कर्जदारांना दिलासा
२० ते २६ जुलै दरम्यान ज्यांचे कर्जाचे ईएमआय हप्ते आहेत, त्या तारखेला भरणे बंधनकारक आहे. अन्यथा कर्जानुसार दंड लावला जातो. सहकारी, राष्ट्रीयीकृत बँकेतही वाहन तारण, गृहतारण, घरबांधणी, घर दुरुस्ती असे कर्ज वाटप केले आहे. मात्र, रिझर्व्ह बँकने 30 ऑगस्टपर्यंत अशाप्रकारे दंड वसूल करू नये, असे आदेश या बँकांना दिले आहेत.
हे पर्याय....
- तत्काळ फायनान्स कंपनीला मेल करून ईसीएस न करण्याची सूचना करणे
- संबंधित खात्यावर ऑनलाईनने पैसे जमा करणे
- कर्ज हप्ता वर्ग होत असलेल्या बँकेच्या एटीएम सेंटरवर जाऊन जमा मशीनच्या साहाय्याने हप्त्याएवढे पैसे जमा करणे
बँका बंद असल्या तरी एटीएम सेंटर सुरू आहेत. याठिकाणी खात्यावर पैसे जमा करण्याची सुविधा आहे. फायनान्स कंपनीला धनादेश अथवा ईसीएस केला असेल. त्यांनी सेंटरवर जाऊन पैसे जमा करणे योग्य ठरणार आहे. तसेच रिझर्व्ह बँकेच्या सूचनांनुसार सहकारी बँकेतील कर्जदारांना दंड लागणार नाही.
सत्यजित जगदाळे,
बँक अधिकारी
दुहेरी दंड
खात्यावर बॅलन्स न ठेवल्यामुळे संबंधित बँका किमान शंभर रुपये दंड आकारणार आहेत. तसेच फायनान्स कंपनीही हप्ता तारखेला जमा केला नसल्यामुळे पाचशे ते हजार रुपये दंड वसूल करणार आहे. मागील लॉकडाऊननंतर कर्जदार फायनान्स कंपनी यांच्यामध्ये यावरून वादाचे प्रसंग घडले होते.