कळंब्यावर पाणीटंचाईची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:22 AM2021-04-18T04:22:10+5:302021-04-18T04:22:10+5:30

कळंबा : एप्रिलच्या मध्यावर कळंबा तलावातील पाणीपातळीत झपाट्याने घट होऊन पाणीपातळी तेरा फुटांवर आली असून, तलावपात्रातील ऐतिहासिक शाहूकालीन विहीर ...

Sword of water scarcity hanging on Kalambya | कळंब्यावर पाणीटंचाईची टांगती तलवार

कळंब्यावर पाणीटंचाईची टांगती तलवार

Next

कळंबा : एप्रिलच्या मध्यावर कळंबा तलावातील पाणीपातळीत झपाट्याने घट होऊन पाणीपातळी तेरा फुटांवर आली असून, तलावपात्रातील ऐतिहासिक शाहूकालीन विहीर उघडी पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कळंबा परिसरातील पाणीटंचाईचे सावट दिवसेंदिवस गडद होत चालल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.

तलावातील जैवविविधता कायम राहावी यासाठी किमान दहा फूट मृत पाणीसाठा शिल्लक ठेवावा लागणार असल्याने मे महिन्यात पाणी प्रश्न चिघळण्याची चिन्हे आहेत. यंदा एप्रिल महिन्यात तापमानात उच्चांकी वाढ झाल्याने पाणी बाष्पीभवनाचा वेग वाढला. त्यात प्रतिवर्षी पाणीवाटपाचे नियोजन करण्यात पालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने पाणीटंचाईची तीव्रता पावसाळ्यापूर्वीच जाणवत असल्याचे चित्र आहे. कळंबा, पाचगावमधील नागरिकांची पाण्याची गरज भागवत जनावरांसाठी पाणी कुठून आणायचे, असा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनास पडला आहे.

ऐन मे महिन्यात पाणीटंचाईचा प्रश्न जटिल बनणार, हे लक्षात येताच कळंबा ग्रामपंचायत प्रशासनाने पालिका पाणीपुरवठा विभागास तलावातून कमी पाणीउपसा करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. मात्र, पालिका प्रशासनाने याबाबत अद्यापही निर्णय घेतलेला नाही.

चौकट : प्रशासनाची तारेवरची कसरत

पाणीटंचाईचा विचार करता उपलब्ध पाणीसाठ्यातून उपनगरांची गरज भागवतानाच पालिका प्रशासनास तारेवरची कसरत करावी लागते.

आजमितीला कळंबा ग्रामपंचायत दररोज एक एमएलडी, तर पालिका पाणीपुरवठा विभाग बी वॉर्डला पाणीपुरवठा करण्यासाठी दररोज सहा एमएलडी पाणीउपसा करते. सध्या उपलब्ध पाणीसाठ्यापैकी केवळ तीन फूट पाणीउपसा करता येणे शक्य असल्याने ऐन मे महिन्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.

चौकट: शाहूकालीन विहीर गाळात

ऐन उन्हाळ्यात तलावातील पाणीसाठा कमी झाल्यास पाणीटंचाई भासू नये यासाठी तलाव पात्रात चाळीस फूट रुंद व साठ फूट खोल विहीर काढली होती. ऐन पाणीटंचाई काळात ती उपयुक्त ठरते; पण प्रदूषण व गाळात विहिरीचे अस्तित्व हरवले आहे. दरम्यान, भविष्यात पाणीटंचाईची भीषणता विचारात घेऊन पुणे पालिकेने बांधकाम परवान्यासोबत रेनवॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे केले आहे. शिवाय एक दिवस आड पाणीपुरवठा कायम ठेवल्याने पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यात यश मिळवले आहे. पुणे पालिकेचा हा पॅटर्न कोल्हापूर महापालिकेनेही राबविण्याची गरज आहे.

फोटो: १७ कळंबा तलाव

ओळ

ऐन एप्रिल महिन्यात कळंबा तलावाची पाणीपातळी अवघी तेरा फुटांवर येऊन पोहोचल्याने मे महिन्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Web Title: Sword of water scarcity hanging on Kalambya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.