शपथ घेऊन लाचेची मागणी, वर्षात ३० गुन्हे, महिन्यात दोन ट्रॅप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 12:58 PM2020-01-29T12:58:40+5:302020-01-29T12:59:03+5:30
लाच देणार नाही, घेणार नाही, शासकीय-निमशासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, अशी शपथ घेणारेच अधिकारी व कर्मचारी लाच घेताना सापडले आहेत.
एकनाथ पाटील
कोल्हापूर : लाच देणार नाही, घेणार नाही, शासकीय-निमशासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, अशी शपथ घेणारेच अधिकारी व कर्मचारी लाच घेताना सापडले आहेत.
महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, आरटीओ, नगरभूमापन, बँका, रजिस्ट्रार, आदी कार्यालयांत कामाच्या बदली लाच स्वीकारणाऱ्यां अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सन २०१९ मध्ये ३० गुन्हे दाखल करून ४१ जणांना अटक झाली आहे. त्यामध्ये एकालाच शिक्षा लागली आहे. महिन्याला दोन ट्रॅप होत असले, तरी लाचलुचपत विभागाच्या कारवाईमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण फारच कमी असल्याने अधिकारी, कर्मचारी लाच स्वीकारण्याची भीती बाळगत नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे.
दरवर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन केले जाते. शहरात रॅलीद्वारे भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत जनजागृती करीत शासकीय-निमशासकीय कार्यालयात शपथ घेऊन कार्यक्रमाचा प्रारंभ केला जातो, अशा प्रबोधनावर भर दिला जात असताना, एकीकडे कागदपत्रांमध्ये त्रुटी दाखविल्याने किरकोळ कामासाठी नागरिकांना दोन-तीन महिने हेलपाटे मारावे लागतात.
शेवटी वैतागून काम पूर्ण करण्यासाठी ‘साहेब, पैसे घ्या; पण काम करा,’ असे म्हणण्याची वेळ येते. घराची नोंद सातबारा पत्रकी घालण्यासाठी, प्लॉटचे खरेदी व्यवहार नियमित करण्यासाठी मूल्यांकन दाखल्याच्या मोबदल्यात, कार्य मूल्यमापन अहवाल देण्यासाठी, पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीमध्ये सहकार्य करण्यासाठी, वॉरंटवरील अटक टाळण्यासाठी, इंदिरा आवास घरकुल योजनेतून घराचे बांधकाम पूर्ण झाल्याचा दाखला देण्यासाठी, तर दुकानांचे वजनकाट्यांचे प्रमाणपत्र देण्यासाठी, सातबारा दाखल्यावर नोंदणी किंवा कर्जबोजा नोंद करून देण्यासाठी पैशाची मागणी केली जाते.
यांना झाली शिक्षा
ट्रॅक्स वाहनावर कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचप्रकरणी आर. टी. ओ. सुपे पोस्ट (चंदगड)चे तत्कालीन सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रशांत बाळासाहेब शिंदे (रा. कोल्हापूर) व त्यांचा खासगी एजंट समीर रवळनाथ शिनोळकर (रा. यशवंतनगर, ता. चंदगड) यांना प्रत्येकी तीन वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.
शपथ घेऊन लाच घेणारे अधिकारी, कर्मचारी
तलाठी चंद्रकांत मारुती अस्वले, विनोद आप्पासाहेब कांबळे, शिवाजी चंदर कोळी, विजय विष्णु चौगले, क्रांती सुनील सप्रे, सुनील बाबूराव पांढरे, गणेश दत्तात्रय शिंदे, ग्रामसेवक संभा शंकर कांबळे, आण्णाप्पा बाळू कुंभार, एजंट राजेंद्र पोपट कांबळे, गटविकास अधिकारी अरविंद आण्णाप्पा धरणगुत्तीकर, एजंट सुशांत बाजीराव लव्हटे, जयवंत आबाजी तोडकर, लिपिक अनिल महादेव नांद्रे, मंडल अधिकारी विष्णू चंद्रकांत कुंभार, कोतवाल दिगंबर आनंदा गुरव, सीपीआर रुग्णालयाचे भांडारपाल जयवंत शंकर पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ सहायक शालन कृष्णात माने, मैल कामगार बाळू आनंदा निकम, मंडल अधिकारी मनोज कौतिक दाभाडे, वीज मंडळ सहायक जीवन महादेव कांबळे, सहायक अभियंता राजेश अनिल घुले, पोलीस पाटील रामचंद्र शिवाजी सपकाळ, डाटा एंट्री आॅपरेटर साताप्पा कृष्णा चौगुले, ग्रामसेवक आनंदा पांडुरंग द्रविड, विस्तार अधिकारी बाळासाहेब मारुती कांबळे, चंदन कोंडिबा कांबळे, वसुली निरीक्षक गणेश विठ्ठल लिगाडे, अनिल बाबासो पाटील, उमेश तुकाराम शिंदे, पोलीस अजीज खुदबुद्दीन मुल्लाणी, विलास शंकर देसाई, राजाराम धोंडिराम पावसकर, सतीश बापुसो खुटावळे, अजीज रमजान शेख, एजंट दाऊद बाबालाल पाटणकर, सरपंच पंडित बापू शेळके, सहायक संचालक बसवराज शांताप्पा मालगट्टी.
लोकांनी निर्भयपणे तक्रार करण्यास पुढे यावे. आम्ही स्वत:हून प्रत्येक शासकीय कार्यालयात जाऊन प्रलंबित प्रकरणांसाठी उंबरे झिजविणाऱ्या नागरिकांची भेट घेऊन त्यांना दिलासा देत आहोत; त्यामुळे सध्या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे.
आदिनाथ बुधवंत,
पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत विभाग, कोल्हापूर