मराठा आरक्षणप्रश्नी सरकारचे प्रतीकात्मक श्राद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 05:25 PM2020-09-21T17:25:30+5:302020-09-21T17:50:05+5:30
मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारचे प्रतीकात्मक श्राद्ध घालण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडत आंदोलकांना ताब्यात घेतले. या आंदोलनात शाळकरी विद्यार्थ्यांचाही सहभाग होता.
कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. पोलीस भरती प्रक्रिया थांबली पाहिजे, विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात टाकणाऱ्या सरकारचा निषेध असो, फसवणूक करणाऱ्या सरकारचा निषेध असो!... अशा घोषणा देत मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारचे प्रतीकात्मक श्राद्ध घालण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडत आंदोलकांना ताब्यात घेतले. या आंदोलनात शाळकरी विद्यार्थ्यांचाही सहभाग होता.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने समाजात असंतोषाचे वातावरण असून व्यवस्थेला जाग आणण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरात आंदोलकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारचे प्रतीकात्मक श्राद्ध घालण्यात येणार होते. दुपारी १२.३० वाजता आंदोलक विविध घोषणा देत महावीर गार्डनपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत चालत आले.
येथे दिलीप पाटील म्हणाले, महाराष्ट्र शासनाने चार दिवसांपूर्वी मराठा समाजाला चांगली बातमी देऊ असे सांगितले. पोलीस भरती करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली. आम्ही १४ टक्के राखीव ठेवू असे ते म्हणतात; पण हे कायद्यानुसार शक्य नाही. त्यामुळे आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत पोलीस भरती थांबविण्यात यावी, प्रशासनानेही आमच्या भावना समजून घ्याव्यात.
यावेळी आंदोलकांनी सरकारचे श्राद्ध घालण्याचा प्रयत्न केला गेला. तो हाणून पाडत पोलिसांनी साहित्य जप्त केले. आंदोलकांना ताब्यात घेऊन शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद करून सगळ्यांना सोडून देण्यात आले.
यावेळी सचिन तोडकर, स्वप्निल पार्टे, रवींद्र मुदगी, शैलेश जाधव, ऋषीकेश मराठे, केदार चौगुले, ऋषीकेश कारंजे, राजेंद्र चव्हाण, पापा प्रभावळे, अभिजित सावंत, समरजित तोडकर, स्नेहा चव्हाण, रेणुका तोडकर, उत्तम पोवार, प्रथमेश नलवडे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करू : सतेज पाटील
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील उपस्थित होते. त्यांनी आंदोलकांना बोलावून घेतले व मागण्या विचारल्या. आंदोलकांनी पोलीस भरती थांबली पाहिजे. सारथीचे पुनरुज्जीवन होऊन त्याला निधी मिळाला पाहिजे, विद्यार्थ्यांची फी माफ झालीच पाहिजे, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या जाचक अटी रद्द करा आणि निधी वाढवून द्या, अशी मागणी केली. यावर मंत्री पाटील यांनी दोन दिवसांत मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करू, असे सांगितले.