सुरक्षिततेसाठी यंत्रणा सज्ज
By admin | Published: October 1, 2016 12:57 AM2016-10-01T00:57:33+5:302016-10-01T00:59:45+5:30
अंबाबाई मंदिर : देवस्थान समितीकडून भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन व देवस्थान समितीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. देवस्थान समितीच्यावतीने भाविकांसाठी दर्शन रांगांमध्ये स्क्रीन, पालखीचे थेट प्रक्षेपण, वैद्यकीय सुविधा, रुग्णवाहिका, शू स्टँड, मुखदर्शन, अशा सोयींसह आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती सचिव विजय पोवार यांनी दिली.
जिल्हा प्रशासन व देवस्थान समितीच्यावतीने शेतकरी संघ, भवानी मंडप येथे आपत्ती नियंत्रण कक्ष उभारण्यात आले असून गरज वाटल्यास भाविक ०२३१-२६४४४४४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
मंदिर व परिसराच्या सुरक्षिततेसाठी ४२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून, मंदिर कार्यालय व जुना राजवाडा पोलिस स्टेशन येथे त्याचे फुटेज पाहण्यासाठी स्वतंत्र व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. ठिकठिकाणी पाच किलोंचे ३० फायर एस्टिंगविशरर्स लावण्यात आले आहेत व विद्यापीठ गेट येथे अग्निशमन गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे.