टेबल, खुर्च्या, संगणकही नाहीत, सभापतीच बसले उपोषणाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 05:08 PM2019-11-07T17:08:19+5:302019-11-07T17:12:08+5:30
पुराच्या काळात प्रचंड नुकसान झाल्याने करवीर पंचायत समितीचे कामकाज ठप्प झाले आहे. कार्यालयांसाठी टेबल, खुर्च्या, संगणकही नसल्याने कामकाजावर विपरित परिणाम झाला आहे; परंतु त्यातून मार्ग निघत नसल्याने अखेर सभापती राजेंद्र सूर्यवंशी हे बुधवारी आपल्या सहकाऱ्यांसह पंचायत समितीसमोर उपोषणाला बसले होते.
कोल्हापूर : पुराच्या काळात प्रचंड नुकसान झाल्याने करवीर पंचायत समितीचे कामकाज ठप्प झाले आहे. कार्यालयांसाठी टेबल, खुर्च्या, संगणकही नसल्याने कामकाजावर विपरित परिणाम झाला आहे; परंतु त्यातून मार्ग निघत नसल्याने अखेर सभापती राजेंद्र सूर्यवंशी हे बुधवारी आपल्या सहकाऱ्यांसह पंचायत समितीसमोर उपोषणाला बसले होते.
महापुरावेळी पंचायत समितीमध्ये पाणी शिरल्याने सकाळी कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन शक्य ते साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न तेव्हा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केला होता; परंतु अनेक दिवस तेथे पाणी असल्याने येथील इमारतींची अक्षरश: वाट लागली आहे.
त्यामुळे संपूर्ण कामकाजच थांबू नये, यासाठी जिल्हा परिषदेसमोरील कागलकर हाऊस, पिवळा वाडा अशा ठिकाणी काही विभाग सुरू करण्यात आले; मात्र ते तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी प्रचंड गैरसोईचे असल्याने पंचायत समितीमधूनच कामकाज सुरू राहावे, अशी मागणी होत आहे; परंतु सध्याच्या करवीर पंचायत समितीमध्ये आवश्यक साधनांची मोठी कमतरता आहे. कामात असणारे संगणक खराब झाल्याने कामकाजात अडथळे येत असून; त्यामुळे तालुक्यातून येणाऱ्या लोकांना उत्तरे देताना अधिकारी, कर्मचाऱ्यांची कुचंबणा होत आहे.
जिल्हा परिषदेकडून तातडीने निधी देता येत नसल्याने पेच निर्माण झाला आहे; त्यामुळे वैतागलेले पंचायत समिती सभापती राजेंद्र सूर्यवंशी हे बुधवारी पंचायत समितीसमोर मंडप टाकून उपोषणाला बसले होते.
दिवसभर उपोषण केल्यानंतर संध्याकाळी जिल्हा परिषदेचे कॅफो संजय राजमाने आणि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांनी सूर्यवंशी यांची भेट घेतली. गुरुवारी जिल्हा परिषदेतील अतिरिक्त टेबल, खुर्च्या, संगणक, प्रिंटर देण्याचाही निर्णय यावेळी चर्चेत घेण्यात आला. गरज पडल्यास संगणक खरेदी करण्यात येईल, असेही राजमाने यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते, पंचायत समिती सदस्य प्रदीप झांबरे, सुनील पोवार, विजय भोसले, कृष्णात धोत्रे, युवराज गवळी, गटविकास अधिकारी सचिन घाडगे, शरद भोसले, ए. व्ही. कांबळे, शंकर यादव उपस्थित होते.
अशाने पंचायत समिती मागे पडेल
पुढची मार्चअखेर जवळ येत असताना दुसरीकडे आमच्या पंचायत समितीमध्ये बसण्यासाठी खुर्च्या नाहीत. संगणक नाहीत. हे चित्र बरोबर नाही. बाकीच्या तालुक्यांमध्ये पाऊस कमी झाल्यानंतर सगळी कामे सुरू झाली; मात्र करवीर तालुक्यात असे झाले नाही. जिल्हा परिषदेने याबाबत गांभीर्याने निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी केली. ही सर्व परिस्थिती जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनाही समक्ष भेटून सांगितली.
पंचायत समितीसाठी आवश्यक साहित्य
खुर्च्या टेबल संगणक प्रिंटर
विविध विभागांची गरज २९८ ९२ ४४ ३२