‘राष्ट्रवादी’ची अस्तित्वासाठी धडपड : करवीरमध्ये पुन्हा मोट बांधण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:43 AM2018-04-07T00:43:13+5:302018-04-07T00:43:13+5:30

कोपार्डे : दहा वर्षांपूर्वी करवीर म्हणजे ‘राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला असे गणित होते; पण मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि या मतदारसंघात असलेल्या ‘राष्ट्रवादी’च्या वर्चस्वाला अधोगती लागली

Tactics for 'NCP's existence': An attempt to re-establish Karveer | ‘राष्ट्रवादी’ची अस्तित्वासाठी धडपड : करवीरमध्ये पुन्हा मोट बांधण्याचा प्रयत्न

‘राष्ट्रवादी’ची अस्तित्वासाठी धडपड : करवीरमध्ये पुन्हा मोट बांधण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देबालिंग्यात उद्या मेळावा, कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी कार्यकर्त्यांनीच कंबर कसली

कोपार्डे : दहा वर्षांपूर्वी करवीर म्हणजे ‘राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला असे गणित होते; पण मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि या मतदारसंघात असलेल्या ‘राष्ट्रवादी’च्या वर्चस्वाला अधोगती लागली. ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांची मोठी संख्या असूनही येथे युतीच्या राजकारणात हे कार्यकर्ते भरडल्याने कार्यकर्त्यांकडूनही सोयीचे राजकीय पुनर्वसन पाहण्याची दृष्टी नडली आणि ‘राष्ट्रवादी’ला घरघर लागली; पण ‘ना घर का ना घाट का’ अशी अवस्था असणाऱ्या कार्यकर्त्यांनी पुन्हा मोट बांधण्यासाठी कंबर कसली असून, उद्या, रविवारी बालिंगा (ता. करवीर) येथे होणाºया पक्षाच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी कार्यकर्त्यांनीच कंबर कसली आह.
२००४ मध्ये करवीर म्हणजे राष्ट्रवादी व राष्ट्रवादी म्हणजेच करवीर, असे राजकीय गणित निर्माण करणाºया माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांचा मोठ्या मताधिक्याने सतेज पाटील यांनी पराभव केला. या मानहानिकारक पराभवाने खचलेल्या खानविलकर यांनी पुढील काळात अज्ञातवासात जाण्याचे पसंद केले. खानविलकर यांच्या निवडणुकीतील पराभवाने व अज्ञातवासाने कार्यकर्ते मात्र नेतृत्वहीन झाले.

यानंतर २००९ च्या विधानसभा निवडणुकीत करवीर मतदारसंघाची पुनर्रचना झाली. यावेळी खानविलकर यांनी करवीर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याऐवजी कट्टर विरोधक असलेल्या सतेज पाटील यांच्या विरोधात कोल्हापूर दक्षिणमधून अपक्ष निवडणूक लढविली आणि तेथेच करवीरमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेतृत्वहीन झाले. त्यातच हा मतदारसंघ या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांच्या युतीमुळे काँग्रेसच्या वाट्याला गेला. या कार्यकर्त्यांनी विरोधी काँग्रेसकडे जाण्याऐवजी याच काळात शिवसेनेचे नवे व तरुण उमेदवार चंद्रदीप नरके यांना जवळ केले, तर काही तटस्थ राहिले.

यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या फौजेने आमदार नरके यांना निवडून येण्याएवढे मताधिक्य दिले, असा आरोप पी. एन. पाटील यांचे कार्यकर्ते आजही करताना दिसत आहेत. यामुळे काँग्रेस आपल्याला जवळ करणार नाही ही पक्की खात्री झाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा आ. नरके यांनाच राजकीय ताकद दिली. यामुळे आ. नरके यांना दोनवेळा आमदार होता आले. हे शिवसेनेचे कार्यकर्तेही मान्य करताना दिसतात.

पण एवढी राजकीय ताकद असताना आमदार नरके यांच्याकडून कार्यकर्त्यांना सन्मानाने वागणूक मिळत नाही, अशी कार्यकर्त्यांकडून प्रतिक्रिया आहे आणि पी. एन. पाटील हे राष्ट्रवादीला पाण्यात बघत असल्याचे त्यांच्या भाषणातून केलेल्या वक्तव्यातून पाहायला मिळते. यामुळे गेली १५ वर्षे या कार्यकर्त्यांची मोठी कुचंबणा झाली आहे.

अस्तित्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्न
हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे, सुनील तटकरे ही मातब्बर लॉबी कोल्हापूर दौरा करून गेली. यामुळे चार्ज झालेल्या करवीरमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बालिंगा (ता. करवीर) येथे माजी जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांचा भव्य नागरी सत्कार व उद्या, रविवारी शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून करवीरमध्ये राष्ट्रवादीचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, करवीर तालुका अध्यक्ष शिवाजी देसाई यांनी कंबर कसली असून, राष्ट्रवादीला करवीरमध्ये उभारी मिळते का, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

Web Title: Tactics for 'NCP's existence': An attempt to re-establish Karveer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.