‘मोक्का’ न्यायालय कोल्हापुरात सुरु करण्यासाठी प्रयत्न : रणजित गावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 03:43 PM2019-05-04T15:43:16+5:302019-05-04T15:44:29+5:30
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी नवीन पदाधिकारी लवकरच मुख्य न्यायाधिशांची भेट घेणार आहेत. या प्रश्नाबरोबरच लवकरचं पुणे येथील विशेष मोक्का न्यायालय, कर्ज वसुली प्राधिकरण आणि महाराष्ट्र महसुल न्यायाधिकरण ही तीन विशेष न्यायालये कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत, अशी माहिती जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. रणजित गावडे यांनी दिली.
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी नवीन पदाधिकारी लवकरच मुख्य न्यायाधिशांची भेट घेणार आहेत. या प्रश्नाबरोबरच लवकरचं पुणे येथील विशेष मोक्का न्यायालय, कर्ज वसुली प्राधिकरण आणि महाराष्ट्र महसुल न्यायाधिकरण ही तीन विशेष न्यायालये कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत, अशी माहिती जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. रणजित गावडे यांनी दिली.
जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारलेनंतर त्यांनी पदाधिकारी, सदस्यांसह ‘लोकमत’ कार्यालयास शनिवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत ‘लोकमत’चे मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांनी केले.
अॅड. गावडे म्हणाले, सर्किट बेंचसाठी वकीलांचा लढा सुरु आहे. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांना पत्रव्यवहार करुन भेटीची वेळ घेत आहोत. जिल्ह्यात ३० पेक्षा जास्त गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कारवाई झाली आहे. आरोपींना घेऊन पोलीसांना तीनशे कि. मी. अंतर पार करुन पुणे येथील विशेष मोक्का न्यायालयात सुनावणीसाठी जावे लागते.
यामध्ये आरोपींच्या सुरक्षेचा ताण पोलीसांवर पडतो. शिवाय वेळ, खर्चही होतो. मोक्का कारवाईची आकडेवारी पाहिली असता कोल्हापुरात विशेष मोक्का न्यायालय सुरु करण्याची गरज आहे. कोल्हापुरात जिल्हा व सत्र न्यायालय असल्याने याठिकाणी विशेष मोक्का न्यायालयात सुरु करता येते.
पुणे मोक्का न्यायालयाकडून कोल्हापूर जिल्हा न्यायालयास अधिकार प्रधान करण्याची प्रक्रिया आहे. ती पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. तसेच कर्ज वसुली प्राधिकरण व महाराष्ट्र महसुल न्यायाधिकरण ही दोन्ही न्यायालये पुणे येथे आहेत. त्यासाठीही वकील, पक्षकारांना पुणे येथे जावे लागते.
जिल्ह्यात खटल्यांचे काम वाढल्याने या दोन्ही न्यायालयांचेही काम वाढले आहे. त्यामुळे पक्षकार आणि वकीलांच्या सोयीसाठी ही तिन्ही न्यायालये लवकरच कोल्हापुरात सुरु करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहे.
यावेळी त्यांचे सोबत उपाध्यक्ष जयेंन्द्र पाटील, सचिव गुरुप्रसाद माळकर, सह सचिव पृथ्वीराज आंबेकर, लोकल आॅडीटर अतुल जाधव, महिला प्रतिनिधी रेश्मा भूर्के, सदस्य वैभव काळे, योगेश नाझरे, सर्वेश राणे, अमित पाटील, सपना हराळे, शिल्पा सुतार, कादंबरी मोरे, अजित पाटील, रमेश पोवार आदी उपस्थित होते.