निवड प्रक्रियेवरून ताणाताणी

By admin | Published: May 14, 2016 01:45 AM2016-05-14T01:45:49+5:302016-05-14T01:45:49+5:30

महिला बालकल्याण समिती : न्यायालयाची मनाई असताना प्रक्रिया राबविल्याने संताप

Tactile over the selection process | निवड प्रक्रियेवरून ताणाताणी

निवड प्रक्रियेवरून ताणाताणी

Next

कोल्हापूर : येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने महिला बालकल्याण समिती सभापती निवडणुकीस तूर्त मनाई केली असताना निवडणूक प्रक्रिया का आणि कशाच्या आधारावर राबवित आहात, असा जाब विचारत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापालिकेचे नगरसचिव तथा सहायक आयुक्त उमेश रणदिवे यांना शुक्रवारी चांगलेच फैलावर घेतले. एवढेच नाही तर राजकीय दबावाखाली सुपारी घेऊन काम करत असल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला. त्यामुळे महापालिकेतील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले.
महानगरपालिकेतील राजकीय सत्तासंघर्ष सध्या चांगलाच उफाळून आला आहे. जातीचे दाखले अवैध ठरविल्यामुळे महापौर, महिला बालकल्याण समिती सभापती याच्यासह सात नगरसेवकांना आपली पदे गमवावी लागली आहेत. विभागीय जातपडताळणी समितीने दिलेल्या निर्णयाविरुद्ध न्यायालयीन लढाई सुरू असतानाच महानगरपालिका प्रशासनाने घाईघाईने ‘स्थायी’चे दोन, ‘परिवहन’ व महिला बालकल्याण समितीचे प्रत्येक एक सदस्य निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे, तसेच महिला बालकल्याण समिती सभापतिपदाची निवडणूक लावली आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नगरसचिव तथा सहायक आयुक्त उमेश रणदिवे यांना टार्गेट केले.
शुक्रवारी सभापती निवडीला न्यायालयाने तूर्त मनाई केली. तो आदेश घेऊन दुपारी दोन वाजता कॉँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक सचिन चव्हाण नगरसचिव कार्यालयात गेले. त्यांनी तो आदेश नगरसचिव उमेश रणदिवे यांच्याकडे दिला तसेच निवडणूक प्रक्रिया राबवू नका, अशी विनंती केली. त्यावेळी उमेश रणदिवे यांनी वकिलांचे मत नोंदवून घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.
मनपा वकील डी. डी. घाडगे यांनी सभापती निवडणुकीस तूर्त मनाई केली असल्याने मंगळवारची निवड सभा तसेच सभेसमोरील विषय क्रमांक १ यावर निर्णय घेता येणार नाही. मात्र, निवडणूक प्रक्रिया राबविण्यास न्यायालयाने मनाई केलेली नाही, त्यामुळे आजपासून ही प्रक्रिया सुरू ठेवण्यास हरकत नाही, असा अभिप्राय दिला. त्यामुळे नगरसचिवांनी दुपारी तीन वाजता सुरू होणारी ही प्रक्रिया दुपारी चार वाजता सुरू केली. त्याची माहिती मिळताच कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी त्यांच्या कार्यालयात गर्दी केली. त्यामध्ये उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी सभापती मुरलीधर जाधव, परिवहन सभापती लाला भोसले, गटनेते शारंगधर देशमुख, सुनील पाटील, राहुल माने, सूरमंजिरी लाटकर, तौफिक मुल्लाणी, आदींचा समावेश होता. या सर्वांनी रणदिवे यांना चांगलेच फैलावर घेतले.
सभापती निवडीस मनाई असताना तुम्ही कोणत्या आधारावर प्रक्रिया राबवित आहात, अशी विचारणा सचिन चव्हाण व राजेश लाटकर यांनी केली. शारंगधर देशमुख यांनी तर रणदिवे यांच्यावर चांगल्याच फैरी झाडल्या. ‘उमेश रणदिवे मालक आहेत की देव आहेत. घाडगे वकिलांनी चुकीचा अभिप्राय दिला आहे. या प्रकरणात अधिकारी व वकील यांच्यात संगनमत झाले आहे. अधिकाऱ्यांनी शेण खाल्लंय. सुपारी घेऊन दबावाखाली काम करीत आहेत,’ असा आरोप त्यांनी केला.
नगरसचिव कार्यालयातील वातावरण तापले असताना अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना तेथे बोलाविण्यात आले. त्यांनी न्यायालयाचा आदेश, मनपा वकिलांचा अभिप्राय वाचून बघितला. न्यायालयाने सभापती निवडणुकीस मनाई हुकूम केला असला तरी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात मनाई केलेली नाही. आम्ही सोमवारी या दाव्यात दाखल होत आहे, त्यावेळी न्यायालय काय निर्णय देईल ते पाहून प्रक्रिया थांबवायची की नाही हे ठरवू, असे देसाई यांनी सांगितले; परंतु त्यानेही नगरसेवकांचे समाधान झाले नाही. कोणत्या आधारावर ही प्रक्रिया राबविता ते लेखी द्या, असा आग्रह त्यांनी धरला. ते मात्र नगरसचिवांनी दिले नाही म्हणून शारंगधर देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ही प्रक्रिया थांबवावी, अशी लेखी पत्र महापालिकेस देण्यात आले. त्यावर पोहोच घेण्यात आली. मनपाच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केला म्हणून तक्रार करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Tactile over the selection process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.