गुरांच्या कानाला टॅगिंग करा, अन्यथा खरेदी-विक्री बंद; राज्य पशुसंवर्धन विभागाचा निर्णय
By समीर देशपांडे | Published: February 28, 2024 01:24 PM2024-02-28T13:24:37+5:302024-02-28T13:25:03+5:30
..तर वाहतूकदार, जनावरांच्या मालकांवर कारवाई
समीर देशपांडे
कोल्हापूर : भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि ईअर टॅगिंग असल्याशिवाय १ जून २०२४ नंतर कोणत्याही जनावराची राज्यात खरेदी-विक्री करता येणार नाही. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने हा निर्णय घेतला असून, ३१ मार्च २४ पर्यंत ईअर टॅगिंग बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे टॅगिंग असल्याशिवाय शासनाच्या पशुवैद्यकीय संस्था, दवाखान्यांमधून पशुवैद्यकीय सेवाही बंद केल्या जाणार आहेत.
पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्याकरिता तसेच ‘प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाने याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार ईअर टॅगिंग आणि भारत पशुधन प्रणालीवर जनावरांची नोंद बंधनकारक करण्यात आली आहे.
या आदेशानुसार जाणीवपूर्वक नष्ट केलेल्या पशुधनाची नोंद आणि ईअर टॅगिंग असल्याशिवाय शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार नाही. नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्यपशूंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचे टॅगिंग असल्याशिवाय त्यांनाही नुकसानभरपाई मिळणार नाही. विक्रीकरिता वाहतूक करण्यात येणाऱ्या राज्यातील जनावरांचे टॅगिंग असल्याची खात्री करूनच पशुधन विकास अधिकारी यांनी आरोग्य प्रमाणपत्र आणि सहायक आयुक्त पशुसंवर्धन यांनी वाहतूक प्रमाणपत्र द्यावे, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
टॅग नसलेल्या जनावरांची खरेदी-विक्री करण्यासाठी १ जून २०२४ पासून बाजार समित्या, आठवडी बाजार आणि गावागावांत खरेदी-विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. टॅग नसलेली जनावरे बाजार समितीत येणार नाहीत, याची दक्षता संबंधित समितीने घ्यावयाची आहे.
..तर वाहतूकदार, जनावरांच्या मालकांवर कारवाई
कोणत्याही प्रकारच्या जनावरांची ईअर टॅगिंगशिवाय वाहतूक केल्यास संबंधित वाहतूकदार आणि जनावरांचे मालक यांच्यावर या नव्या आदेशानुसार कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे गाय आणि बैलांची कत्तलखान्यासाठी चोरून जी वाहतूक केली जाते, त्यावरही बंधने येणार आहेत.