अशासकीय मंडळाचे शेपूट वाढता वाढता वाढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:19 AM2021-07-17T04:19:25+5:302021-07-17T04:19:25+5:30
(बाजार समिती लोगो) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये अशासकीय मंडळावर नियुक्त्यांचा सपाटा लावला आहे. ...
(बाजार समिती लोगो)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये अशासकीय मंडळावर नियुक्त्यांचा सपाटा लावला आहे. कार्यकर्त्यांच्या सोयीचे जणू हे केंद्र बनले असून, आता सोळा सदस्यांचे जम्बो मंडळ कार्यरत झाले आहे.
बाजार समितीच्या संचालक मंडळाची सप्टेंबर २०२०मध्ये मुदत संपली आहे. त्यानंतर तेराजणांचे अशासकीय मंडळ कार्यान्वित झाले. काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना, रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी या तेरा जागा वाटून घेऊन आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लावली. या समितीकडून झालेल्या चुका दुरूस्त करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करणे अपेक्षित होते. मात्र, नेत्यांनी कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी अशासकीय मंडळ आणले. वास्तविक जिल्हास्तरीय संस्थेवर चार ते पाचजणांचे प्रशासकीय मंडळ असते. त्यानुसारच अशासकीय मंडळ असणे गरजेचे होते. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खिरापतीसारखी सदस्य पदे वाटून घेतली. ती कमी पडली की काय म्हणून महिन्यापूर्वी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वाने थेट मारुती ढेरे यांची अशासकीय मंडळात सदस्य म्हणून नियुक्ती केली. त्यांची एखादी बैठक होते की नाही तोपर्यंत दोन सदस्यांची नियुक्ती केली. अर्जुनवाड (ता. राधानगरी) येथील विश्वनाथ हिंदूराव पाटील व मानसिंग उदयसिंग पाटील (असळज, ता. गगनबावडा) यांची नियुक्ती जिल्हा उपनिबंधकांनी केली. विश्वनाथ पाटील हे आमदार प्रकाश आबिटकर यांचे तर मानसिंग पाटील हे पालकमंत्री सतेज पाटील यांचे समर्थक आहेत. त्यामुळे आता सोळाजणांचे जम्बो अशासकीय मंडळ झाले आहे.