वसुलीचा तगादा लावणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:27 AM2021-04-28T04:27:00+5:302021-04-28T04:27:00+5:30
कुरुंदवाड : कोरोना महामारीत बचत गट कंपन्यांकडून वसुलीचा तगादा होत असल्याने त्या कंपन्यांवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन ...
कुरुंदवाड :
कोरोना महामारीत बचत गट कंपन्यांकडून वसुलीचा तगादा होत असल्याने त्या कंपन्यांवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेना शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे यांनी कुरुंदवाड पोलिसांना दिले आहे.
निवेदनात सध्या कोरोनाच्या आपत्तीने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे संचारबंदी झाली आहे. सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रापंचिक गरजांसाठी बचत गटाच्या माध्यमातून खासगी कंपन्यांकडून कर्ज घेतले आहे. लाॅकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे कर्ज अथवा कर्जावरील व्याज, हप्ता परतफेड करणे शक्य नाही. मात्र संबंधित कंपन्यांचे कर्मचारी कर्जदाराच्या घरी येऊन हप्त्यासाठी तगादा लावत आहेत. अशा कर्मचाऱ्यांवर तसेच कंपनीवर गुन्हे दाखल करावेत; अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी राजेंद्र बेले, दत्ता कदम, मिलिंद गोरे, पिटू नरके, उमेश बागडी, बाबासोा गावडे, आदी उपस्थित होते.