बाळूमामा देवालयातील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करा; सेवेकरी, हिंदुत्ववादी संघटनांची मागणी
By इंदुमती सूर्यवंशी | Published: February 27, 2024 05:47 PM2024-02-27T17:47:12+5:302024-02-27T17:47:34+5:30
अधिकाऱ्यांकडून चौकशीत दिरंगाई, भ्रष्टाचाऱ्यांच्या पाठिशी कोण?
कोल्हापूर : आदमापूर (ता. भुदरगड) येथील सदगुरु बाळूमामा देवालयात भ्रष्टाचार प्रकरणात धर्मादायमधील चौकशी अधिकाऱ्यांक़डून जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे. भ्रष्टाचारी विश्वस्तांवर कायदेशीर कारवाई करावी, या प्रकरणी सीआयडीकडून चौकशी व्हावी या मागणीसाठी बाळूमामा हालसिद्धनाथ सेवेकरी संस्था, महाराष्ट्र मंदिर महासंघ व हिंदु जनजागृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला
समन्वयक सुनील घनवट, निखील मोहिते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना याबाबतचे निवेदन दिले. यावेळी सुनील घनवट म्हणाले, बाळूमामांसाठी भक्तांनी वाहिलेला पैसा भक्तांच्याच सुविधांसाठी वापरला गेला पाहीजे. पण अनेक वर्षे विश्वस्तांनी भ्रष्टाचार करून भक्तांची फसवणूक केली आहे. त्यांची सीआयडी चौकशी झाली पाहीजे. त्यांना पाठिशी कोण घालत असेल तर त्या अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहीजे.
बाबासाहेब भोपळे म्हणाले, भ्रष्टाचाराविरोधात काहीजण न्यायालयीन लढा देत आहेत, त्यांना आमचा पाठिंबा आहे. निखील मोहिते म्हणाले, बकरी विक्री थांबवल्याने बग्यातील बकऱ्यांचे हाल सुरू आहेत. कारभारी त्रस्त आहेत. देवालयाच्या कारभारावर कोणाचाही अंकुश नाही. गजानन तोडकर, संभाजी भोकरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मानतेश नाईक, दयानंद कोणकेरी, परेश शहा,संदिप सासने, पराग फडणीस, दिपक देसाई, अक्षय ओतारी यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भ्रष्टाचाऱ्यांच्या पाठिशी कोण?
अधिकारी भ्रष्टाचाऱ्यांची चौकशी का करत नाही. शिवराज नाईकवाडे सारख्या चांगल्या प्रशासकाला बाजूला करून भ्रष्टाचारी व्यक्तीची तिथे नियुक्ती केली आहे. हे अधिकारी आपल्यासोबत खासगी बाऊन्सर घेऊन फिरतात. मंदिर आवारात बाऊन्सरची गरज काय, अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घालण्यासाठीच आणून बसवले आहे का? असा प्रश्न यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला.