नशिल्या अमली पदार्थांविरोधात कारवाई करा: कोल्हापूर जनशक्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 04:58 PM2019-06-22T16:58:40+5:302019-06-22T17:10:07+5:30
कोल्हापूर शहरात उत्तेजक अमली पदार्थांचा शिरकाव झाला आहे. असे पदार्थ बाळगणाऱ्या व्यक्ती, लॉज, औषध दुकानांवर कारवाई करावी, अशी मागणी कोल्हापूर जनशक्तीच्या शिष्टमंडळाने शनिवारी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
कोल्हापूर : शहरात उत्तेजक अमली पदार्थांचा शिरकाव झाला आहे. असे पदार्थ बाळगणाऱ्या व्यक्ती, लॉज, औषध दुकानांवर कारवाई करावी, अशी मागणी कोल्हापूर जनशक्तीच्या शिष्टमंडळाने शनिवारी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे की, देशभरात स्त्रीभ्रूण हत्याविरोधी चळवळ, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाद्वारे महिलांना सामाजिक संरक्षण व पुरुषांच्या बरोबरीने स्वावलंबी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे; तर दुसऱ्या बाजूला महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या काही घटनांनी समाज सुन्न होत आहे. आता त्यामध्ये या अमली पदार्थांची भर पडली आहे.
युवती व महिला नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने; तर मुलीही शिक्षणासाठी घराबाहेर असतात. त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्यांच्यावर नशिल्या पदार्थांचा वापर काही अपप्रवृत्तींकडून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमली पदार्थांविरोधात तीव्र मोहीम राबवावी.
यावर अप्पर पोलीस अधीक्षक काकडे यांनी अमली पदार्थांविरोधात सध्या आठ पथके कार्यरत असल्याचे सांगितले. तसेच यापुढेही आणखी तीव्र मोहीम राबविली जाईल, असे सांगितले.
शिष्टमंडळात सरचिटणीस समीर नदाफ, अरुण अथणे, अण्णा पिसाळ, तय्यब मोमीन, अनीश पोतदार, एम. डी. कुंभार, रियाज कागदी, राजन पाटील, ईश्वरप्रसाद तिवारी, शैलेश देशपांडे, सुनील दमे, लहू शिंदे, आदींचा समावेश होता.