ताम्रपर्णी नदीत दूषित पाणी सोडणाऱ्या उद्योगांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:26 AM2021-04-23T04:26:03+5:302021-04-23T04:26:03+5:30
चंदगड : ताम्रपर्णी नदीतील दूषित पाण्यामुळे नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नदीत दूषित पाणी सोडणाऱ्या ...
चंदगड : ताम्रपर्णी नदीतील दूषित पाण्यामुळे नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नदीत दूषित पाणी सोडणाऱ्या उद्योगांवर कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी कोल्हापूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
चंदगड तालुक्याच्या पूर्व-पश्चिम भागाला जोडणारी ताम्रपर्णी नदी अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याची तहान भागवते. एक महिन्यापूर्वी याच नदीत रसायनमिश्रित पाणी सोडल्यामुळे पाणी दूषित झाले होते.
त्यानंतर आता दुसऱ्यांदा असाच प्रकार घडला आहे. नदीत जागोजागी मासे मृत होऊन पाण्यावर तरंगत आहेत. ते कुजल्यामुळे दुर्गंधी सुटली आहे. पाणीसुद्धा खराब झाले आहे. हे पाणी नागरिकांना पिण्यासाठी वापरल्यास आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
दूषित पाण्याचे नमुने घ्यावेत व कोणत्या उद्योगधंद्यामुळे रासायनिक पाणी नदीत मिळत आहे, याचा त्वरित शोध घेऊन पाणी प्रदूषित करणाऱ्या उद्योगधंद्यावर जलप्रदूषण कायद्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
------------------------
* फोटो ओळी : चंदगड तालुक्यातील ताम्रपर्णी नदीच्या दूषित पाण्याचे नमुने घ्यावेत व दोषींवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन प्रदूषणचे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे यांना देताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे.
क्रमांक : २२०४२०२१-गड-०७