महापालिका प्रशासनावर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 08:37 PM2017-09-20T20:37:16+5:302017-09-20T20:41:22+5:30
कोल्हापूर : महापालिकेचा भोंगळ कारभार आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे शहरात अनेकांचे बळी गेले आहेत
कोल्हापूर : महापालिकेचा भोंगळ कारभार आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे शहरात अनेकांचे बळी गेले आहेत. त्याला जबाबदार धरून महापालिका प्रशासनावर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा विधि व सेवा प्राधिकरण विभागाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांना बुधवारी दिले. दरम्यान, सचिव मोरे यांनी योग्य ती कार्यवाही करावी, यासाठी निवेदनाची प्रत महापालिका आयुक्तांना पाठवली.
शहरातील रस्त्यांची लेव्हल, ड्रेनेजवर झाकण नसणे, दुभाजक, गतिरोधक यांना कोणतेही शास्त्रीय नियम नसल्याने अनेक बळी जाऊन त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. शिवसेनेने अनेकवेळा यासंदर्भात लोकशाही मार्गाने आंदोलने केली आहेत; परंतु महापालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. दोन दिवसांपूर्वी सीपीआर चौक ते कसबा बावडा रस्त्यावर दोघा भावांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस प्रशासन व ठेकेदार जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तसेच मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना योग्य तो मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न करावेत. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, दुर्गेश लिंग्रस, सुजित चव्हाण, शिवाजीराव जाधव, अवधूत साळोखे, राजेंद्र पाटील, शशिकांत बिडकर, रणजित आयरेकर आदी उपस्थित होते.