प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Published: February 10, 2015 11:12 PM2015-02-10T23:12:03+5:302015-02-10T23:52:04+5:30

शिवसेना : नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डोके यांच्याकडे मागणी

Take action against the polluters | प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करा

प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करा

Next

कोल्हापूर : विनाप्रक्रिया सांडपाणी पंचगंगा, कासारी, भोगावती नदीत व शेतात टँकरद्वारे अ‍ॅसिडयुक्त पाणी सोडणाऱ्या जबाबदार घटकांवर कारवाई कधी करणार, अशी मागणी मंगळवारी शिवसेनेने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी सूर्यकांत डोके यांच्याकडे केली. यावेळी जिल्हा उद्योग भवनासमोर कार्यकर्त्यांनी निदर्शने करत पंचगंगा, भोगावती, ताम्रपाणी, वेदगंगा नदी वाचवा अशी घोषणाबाजी केली.
पंचगंगा नदी प्रदूषणास जबाबदार असलेल्या साखर कारखान्यांवर उच्च न्यायालयाने प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश दिले आहेत. त्याचबरोबर तशा सूचना दिल्या आहेत. तरीही, प्रदूषण नियंत्रण मंडळ डोळेझाक करते आहे. हळदी (ता.करवीर) येथे भोगावती नदीत २२ डिसेंबर २०१४ ला मासे मृत झाले. याबाबत भोगावती साखर कारखाना व डिस्टलरीमधून तीन टँकर भरुन विनाप्रक्रिया सांडपाणी बाहेर पडले होते. त्याचबरोबर आसुर्ले-पोर्ले (ता.पन्हाळा) येथील दालमिया खासगी साखर कारखान्याने क्लिनिंगचे पाणी प्रक्रियेशिवाय थेट नाल्यात आल्याने कासारी नदीत मिसळले. त्यानंतर पुन्हा या कारखान्याने विनाप्रक्रिया सांडपाणी सोडले. परिणामी, या पाण्याचा पन्हाळा गावाला पुरवठा झाल्याची तक्रार झाली. ही वस्तुस्थिती खरी असल्याचे पन्हाळा व करवीर प्रांत यांच्या निदर्शनास आले. तसेच गत महिन्यात तेरवाड बंधारा (ता. शिरोळ) येथे पंचगंगा नदीत तर पाच दिवसांपूर्वी भोगावती नदीतील शेकडो मासे मृत झाले. त्यानंतर प्रदूषण मंडळ व उच्च न्यायालयाचे समिती सदस्य उदय गायकवाड यांनी संयुक्त पाहणी केली. त्यावेळी टँकरद्वारे अ‍ॅसिडयुक्त पाणी शेतात सोडल्याचे स्पष्ट झाले व ते पाणी नदीत मिसळले. त्यामुळे प्रदूषित घटकांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांनी केली.
पवार यांनी, या प्रश्नासंदर्भात पर्यटनमंत्री रामदास कदम यांची भेट घेऊन अहवाल देणार असल्याचे डोके यांना सांगितले. त्यावर डोके यांनी, सर्व प्रांत, तहसीलदार, उच्च न्यायालय व प्रदूषण नियंत्रण मंडळाने नेमलेल्या समितीतील सदस्यांची सात दिवसांत संयुक्त बैठक बोलवतो, असे आश्वासन दिले. निदर्शनात दिलीप पाटील-कावणेकर, रवी चौगुले, सुजीत चव्हाण, बाजीराव पाटील, दत्ता टिपुगडे, राजू यादव, कमलाकर जगदाळे, दिलीप जाधव, शशी बिडकर, किरण माने, संदीप बिडकर, आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)

जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीबाबत पत्र
शिवसेनेने मंगळवारी केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी मनीष होळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीबाबत पत्र दिले आहे. जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी प्रदूषण रोखण्यासंदर्भात आजपर्यंत प्रांताधिकारी, तहसीलदार व प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेळोवेळी केलेल्या कारवाईबाबत चर्चा करण्यासाठी बैठक बोलवावी, अशी मागणी प्रादेशिक अधिकारी सूर्यकांत डोके यांच्याकडे निदर्शनावेळी केली होती. त्यानुसार होळकर यांनी, पुढील आठवड्यातील सोयीची तारीख, वेळ द्यावी, अशी मागणी पत्राद्वारे जिल्हाधिकारी प्रशासनाकडे केली आहे.

Web Title: Take action against the polluters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.