छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य: प्रशांत कोरटकरवर कारवाई करा, अन्यथा..; कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 12:02 IST2025-02-26T12:00:15+5:302025-02-26T12:02:17+5:30

छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचाही एकेरी उल्लेख केल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट

Take action against Prashant Koratkar; Otherwise we will take action Warning of gross Maratha community in Kolhapur | छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य: प्रशांत कोरटकरवर कारवाई करा, अन्यथा..; कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचा इशारा

छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य: प्रशांत कोरटकरवर कारवाई करा, अन्यथा..; कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचा इशारा

कोल्हापूर : इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देऊन छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल करून कारवाई करा, अन्यथा आम्ही कारवाई करू, असा इशारा कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.

इंद्रजित सावंत यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाबाबत केलेल्या मांडणीवरून त्यांना कोरटकर याने सोमवारी (दि. २४) रात्री फोन करून ‘तुम्हाला घरात घुसून मारू,’ अशी धमकी दिली. या संभाषणात कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचाही एकेरी उल्लेख केल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील सकल मराठा समाजानेही कोरटकरच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला.

वसंतराव मुळीक म्हणाले, शिवरायांच्या कार्याची जगाने प्रेरणा घेतली आहे. असे असताना कोरटकरने असे वक्तव्य करणे निषेधार्थ आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर तत्काळ कारवाई करावी, अन्यथा आम्हीच त्याच्यावर कारवाई करू. हर्षल सुर्वे म्हणाले, इतिहासाबद्दल जे चुकीचे लेखन करून ठेवले आहे, त्याबद्दल पुराव्यानिशी सत्य मांडण्याचा प्रयत्न इंद्रजित सावंत यांनी वेळोवेळी केला आहे. सावंत यांचे संशोधन हे कोणा एका समाजाच्या विरुद्ध नसून, एका प्रवृत्तीच्या विरोधात आहे. सावंत यांना याच्याबद्दल उत्तर देता येत नाही म्हणून त्यांना फोन करून धमकी द्यायचा प्रयत्न होत आहे. 

कोरटकरने अश्लील शिवीगाळ तर केलीच; पण छत्रपती शिवाजी महाराज व मराठा समाज यांच्याबद्दलही अनुद्गार काढले आहेत. जर कोणी अशी धमकी देण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्हीही त्याच पद्धतीने कोल्हापुरी पायताण हातात घेऊन या प्रवृत्तीच्या विरोधात त्यांच्यासमोर उभे आहोत. यावेळी दिलीप देसाई, किरणसिंह चव्हाण, अमित अडसूळ, संपत चव्हाण, ओंकार कोळेकर, सागर पाटील, शिवराजसिंह गायकवाड, मुरारराव शिंदे, दिगंबर भोसले, प्रदीप हांडे उपस्थित होते.

कोरटकरविरोधात देसाई यांची तक्रार

कोरटकरविरोधात सकल मराठा समाजाचे समन्वयक दिलीप देसाई यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे ऑनलाइन तक्रार करत कारवाई करण्याची मागणी केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही तर न्यायालयात जाणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

Web Title: Take action against Prashant Koratkar; Otherwise we will take action Warning of gross Maratha community in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.