जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:38 AM2021-02-23T04:38:39+5:302021-02-23T04:38:39+5:30
कोल्हापूर : निवडणुकीसारखे अत्यंत महत्त्वाचे, तसेच जबाबदारीचे काम तितक्याच बेजबाबदारपणे केल्यामुळे प्रारुप मतदार याद्यांत मोठ्या चुका झाल्या आहेत. म्हणूनच ...
कोल्हापूर : निवडणुकीसारखे अत्यंत महत्त्वाचे, तसेच जबाबदारीचे काम तितक्याच बेजबाबदारपणे केल्यामुळे प्रारुप मतदार याद्यांत मोठ्या चुका झाल्या आहेत. म्हणूनच या कामास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक पांडुरंग आडसुळे यांनी सोमवारी उपायुक्त निखिल मोरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.
एक प्रभागातून दुसऱ्या प्रभागात मतदारांची नावे गेली असताना त्याबाबत तक्रार करायला गेल्यावर संबंधित अधिकारी समाधानकारक उत्तरे देत आहेत. यादी, त्याचे अनुक्रमांक, याद्यातील पानांची झेरॉक्स अर्जासोबत जोडण्याची सूचना करीत आहेत. जेथे सगळ्याच प्रारुप याद्यात चुका असताना आम्ही मतदार याद्या तरी किती घ्यायच्या, अशी विचारणा आडसुळे यांनी मोरे यांच्याकडे केली.
प्रभाग रचनेचे नकाशे तयार असताना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदार यादीची फोड करताना त्यांनी सीमारेषांची खातरजमा केलेली नाही. जागेवर जाऊनही त्यांनी पाहणी केलेली नाही. कार्यालयात बसून याद्या तयार केलेल्या आहेत. अशा बेजबाबदार कामामुळे प्रशासनालाही मनस्ताप झाला असून, दुबार काम करावे लागणार आहे. म्हणूनच अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आडसुळे यांनी केली आहे.