संजीव पुनाळेकर यांच्यावर कारवाई करा
By admin | Published: January 15, 2016 11:52 PM2016-01-15T23:52:57+5:302016-01-16T00:49:07+5:30
शिष्टमंडळाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन : कायदेशीर सल्ला घेऊन कारवाईचे आदेश : प्रदीप देशपांडे --गोविंद पानसरे हत्या प्रकरण
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्ये प्रकरणातील साक्षीदारांना पत्राद्वारे ठार मारण्याची धमकी देणारे हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव अॅड. संजीव पुनाळेकर यांच्यावर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन कॉ. दिलीप पवार यांच्यासह शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना शुक्रवारी दिले. त्यावर देशपांडे यांनी शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांना कायदेशीर सल्ला घेऊन तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले.
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी शाळकरी मुलाच्या जीविताबद्दल काळजी व्यक्त करणारे, परंतु अप्रत्यक्षरीत्या या खटल्यातील साक्षीदारांना भीतीने धडकी भरेल, अशा आशयाचे धमकी देणारे पत्र ‘सनातन’च्या वतीने अॅड. संजीव पुनाळेकर यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना पाठविले होते. या पत्राचा संदर्भ घेत पानसरे कुटुंबीयांचे स्नेही व पानसरे विचाराचा पाठीराखा असणारे कॉ. दिलीप पवार यांनी या खटल्यातील सर्वच साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न अॅड. पुनाळेकर यांनी केला आहे. त्यांच्या विरोधात फिर्याद देण्यास पवार यांच्यासह मेघा पानसरे, अॅड. विवेक घाटगे, प्रकाश मोरे शुक्रवारी सकाळी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गेले. परंतु, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी गैरहजर असल्याने शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक देशपांडे यांची भेट घेतली. अॅड. घाटगे यांनी अॅड. पुनाळेकर हे पश्चिम महाराष्ट्राला गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे, असे जाहीरपणे वक्तव्य करीत आहेत. पानसरे खटल्यामध्ये कॉ. पवार यांच्यासह ७७ साक्षीदार आहेत. ते सर्व सकाळी फिरायला जातात. त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका आहे. अॅड. पुनाळेकर यांच्या पत्रातील मजकूर व त्यांनी केलेली वक्तव्ये हा पुरावा न्यायालयासमोर ठेवला तर आरोपीला शिक्षा होऊ शकते. आरोपी समीर गायकवाडच्या बाजूने त्याचे आई, भाऊ किंवा नातेवाईक पुढे आले नाहीत. सनातन आली आहे. त्यामुळे त्याला वाचविण्यासाठी त्यांचा हा खटाटोप आहे. या खटल्यातील प्रत्येक साक्षीदाराला आपल्या रोजच्या दिनचर्याची माहिती हे लोक घेत असतील अशी भीती मनामध्ये आहे. त्यामुळे कॉ. पुनाळेकर यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात कॉ. पवार यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.
त्यावर पोलीस अधीक्षक देशपांडे यांनी अॅड. पुनाळेकर यांनी लिहिलेल्या पत्रातील मजकूर चिंताजनक वाटतो, याची जाणीव पोलिसांना आहे. पोलीस महासंचालकांनीदेखील यासंदर्भात दखल घेत आम्हाला मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. आपल्या अर्जासंदर्भात शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे व शाहूपुरीचे निरीक्षक अरविंद चौधरी यांच्याशी चर्चा करून त्यांना कारवाई करण्याचे आदेश देऊ, अशी ग्वाही यावेळी दिली.
त्यानंतर देशपांडे यांनी दोघाही अधिकाऱ्यांशी चर्चा करून कायदेशीर सल्ला घेऊन तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)
शाहूपुरीचे निरीक्षक गैरहजर
पानसरे खटल्यासंदर्भात साक्षीदारांना धमकी देणाऱ्या अॅड. पुनाळेकर यांच्या विरोधात शुक्रवारी फिर्याद देण्यास शिष्टमंडळ येणार आहे, अशी पूर्वकल्पना शुक्रवारी शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांना दिली होती. परंतु, ते आज मुद्दाम गैरहजर राहिल्याची तक्रार अॅड. विवेक घाटगे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली.