जीवनदायी’त अपहार करणाऱ्यांवर कारवाई करा
By admin | Published: June 6, 2015 12:20 AM2015-06-06T00:20:12+5:302015-06-06T00:28:04+5:30
शिवसेनेकडून जिल्हा शल्यचिकित्सक धारेवर : इन कॅमेरा शस्त्रक्रिया करण्याची मागणी; वरिष्ठांना अहवाल पाठवण्याचे आश्वासन--लोकमतचा पाठपुरावा
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये ज्या रुग्णालयांनी अपहार, गैरव्यवहार केला आहे, त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच यापुढे सर्व शस्त्रक्रिया या ‘इन कॅमेरा’ कराव्यात, अशी मागणी शुक्रवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली.
येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे (सीपीआर) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. डी. आरसूळकर व जिल्हा समन्वयक डॉ. अशोक देठे यांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आरसूळकर व देठे यांना धारेवर धरले.
केंद्र सरकारच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये सध्या जिल्ह्यातील ३१ रुग्णालयांचा समावेश आहे. या योजनेमधील काही रुग्णालये, तेथील डॉक्टर रुग्णांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्यांची आर्थिक लूट करत आहेत. यामध्ये विशेषत: हृदयशस्त्रक्रियेच्या बाबतीत अनेकवेळा रुग्णांच्या नातेवाइकांना परदेशी बनावटीची ‘स्प्रिंग’ बसविण्यासाठी भाग पाडून त्यांच्याकडून पॅकेजपेक्षा ५० हजार ते दीड लाखांपर्यंतची जास्तीची रक्कम घेऊन आर्थिक गंडा घातला जातो. यासाठी या योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या रुग्णालयांच्या डॉक्टरांची बैठक घ्यावी. त्याचबरोबर डॉक्टरांच्या ओळखीचा फायदा घेऊन काही धनदांडगे रुग्णसुद्धा खोटी कागदपत्रे सादर करून या योजनेचा लाभ उठवत आहेत.
डॉ. बी. डी. आरसूळकर व डॉ. अशोक देठे यांनी राजीव गांधी जीवनदायीमधील रुग्णालयांचा अहवाल वरिष्ठांना पाठवू व त्यानंतर कारवाई करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात रवी चौगुले, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, तानाजी आंग्रे, राजू यादव, राजेंद्र पाटील, उत्तम पाटील, उदय सुतार, शशिकांत बिडकर, दिलीप देसाई, पप्पू नाईक, योगेंद्र माने, दीपाली शिंदे, कमल पाटील, सुजाता सोहनी, रणजित आयरेकर, प्रवीण पालव, आदींचा सहभाग होता.
पैसे मागितल्यास संपर्काचे आवाहन
ज्या रुग्णालयांमध्ये या योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ केल्यास किंवा या योजनेच्या लाभार्थी रुग्णांकडून नियमबाह्य अन्य पैशांची मागणी केल्यास पद्मा टॉकीज येथील जिल्हा शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी यावेळी केले.