कामचुकार शिक्षकांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:22 AM2021-03-18T04:22:37+5:302021-03-18T04:22:37+5:30
मलकापूर : शाहूवाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे काम करणाऱ्या कामचुकार शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी पंचायत समितीच्या मसिक बैठकीत ...
मलकापूर : शाहूवाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे काम करणाऱ्या कामचुकार शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी पंचायत समितीच्या मसिक बैठकीत करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती विजय खोत होते. तालुक्यातील प्राथमिक शाळांना सभापती विजय खोत व गटशिक्षण अधिकारी उदय सरनाईक यांनी भेटी दिल्या होत्या. त्यावेळी बहुतांश शिक्षक गैरहजर होते. अशा शिक्षकांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी पंचायत सदस्य अमर खोत यांनी केली. शिक्षण प्रशासनाकडे चार वर्षे मुख्याध्यापकांची माहिती मागून मिळत नाही. प्रशासन कुणाला घाबरत आहे, त्याचे गौडबंगाल काय, मद्यपान करून शाळेत जाणाऱ्या शिक्षकावर कारवाई का होत नाही, असा प्रश्न अमर खोत यांनी उपस्थित केला. गल्लेलठ्ठ पगार घेणारे केंद्रप्रमुख मुख्याध्यापक व शिक्षकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप अमर खोत यांनी केला. शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांना पाठीशी घालू नये, असे विजय खोत यांनी सांगितले. शिक्षकांचा रजा अर्ज केंद्रप्रमुखांच्या खिशात कसा. अशा केंद्रप्रमुखांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अमर खोत यांनी केली. सर्व शिक्षकांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या आहेत. चूक झाल्याचे त्यांनी मान्य केले आहे. इथून पुढे अशी घटना घडल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा उपसभापती दिलीप पाटील यांनी दिला.
पैसे भरूनही कनेक्शनसाठी हेलपाटे
तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाच वर्षांपूर्वी वीज पंपाच्या कनेक्शनसाठी महावितरणकडे पैसे भरले आहेत. मात्र, अजूनही त्यांना कनेक्शन मिळालेले नाही. त्यांना वारंवार महावितरण कार्यालयाकडे हेलपाटे मारावे लागतात. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. मग आम्ही पालकमंत्र्यांकडे तक्रारी करायच्या का? असा संतप्त सवाल विजय खोत यांनी केला. कोकरूड-मलकापूर राज्य मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असून, जुन्या मोरीना नवीन मुलामा देऊन काम केले जात आहे. तुरुकवाडी येथे मोरीवर भराव टाकलेला नाही. या कामाची चौकशी करण्याची मागणी अमर खोत यांनी केली.