सीईटीपी व कत्तलखान्यावर कारवाई करा
By admin | Published: November 21, 2014 09:31 PM2014-11-21T21:31:49+5:302014-11-22T00:17:56+5:30
इचलकरंजी पालिकेवर शिवसेनेचा मोर्चा : नगराध्यक्षा, मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्धारे मागणी
इचलकरंजी : शहरातील लाखेनगर-जाधव मळा येथे असलेल्या सीईटीपी व कत्तलखाना या प्रकल्प परिसरात प्रदूषण आणि कुत्र्यांच्या उपद्रवामुळे तेथील नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. म्हणून सीईटीपीच्या व्यवस्थापनावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि कत्तलखाना ताबडतोब बंद करावा, अशी मागणी करणारा मोर्चा शिवसेनेच्यावतीने नगरपालिकेवर काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख महादेव गौड, नगरसेवक सयाजी चव्हाण, आदींनी केले.
लाखेनगर-जाधव मळा परिसरातील नागरिकांचा निघालेला मोर्चा नगरपालिकेवर आला. नगरपालिकेच्या कार्यालयात आलेल्या मोर्चाच्यावतीने नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांना निवेदन देण्यात आले. औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून (सीईटीपी) उग्र वास व आवाज येत असल्याने त्या परिसरात असलेले नागरिक विशेषत: लहान मुलांना मोठा त्रास होत आहे. त्यामुळे लोकांच्या जीवनाशी खेळणाऱ्या सीईटीपीच्या व्यवस्थापनावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच कत्तलखाना असलेल्या परिसरामध्ये सुमारे आठ ते दहा हजार लोकसंख्या राहात आहे. कत्तलखान्यामध्ये मोठी जनावरे,
तसेच मृत झालेली जनावरेसुद्धा
कत्तल केली जातात. या जनावरांचे मांस बाहेर नेताना योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याने दुर्गंधी सुटते.
त्यामुळे त्या परिसरामध्ये कुत्र्यांचा नेहमी वावर असतो.
या कुत्र्यांचा त्रास होत असतो. तसेच आसपास पसरलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे डेंग्यूसारख्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तरी हा कत्तलखाना ताबडतोब बंद करावा; अन्यथा शिवसेनेला तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
आंदोलनकर्ते व नगराध्यक्ष बिरंजे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर दोन्ही ठिकाणी भेट देऊन योग्य ती कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)
इचलकरंजीच्या नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे व मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांना निवेदन देताना महादेव गौड. यावेळी सयाजी चव्हाण, सुनील साळुंखे, राजू आलासे, आदी उपस्थित होते.