छायांकित प्रतींना विलंब करणाऱ्यांवर कारवाई करा
By admin | Published: March 10, 2016 12:54 AM2016-03-10T00:54:19+5:302016-03-10T01:10:24+5:30
‘एनएसयूआय’ची निदर्शने : परीक्षा नियंत्रकांकडे शिष्टमंडळाद्वारे मागणी, न्याय न मिळाल्यास कुलगुरुंकडे जाणार
कोल्हापूर : अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांना पहिल्या सत्रातील परीक्षांतील काही उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती देण्यास दिरंगाई होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असून, संबंधितांवर कारवाई करावी, यासाठी बुधवारी ‘एनएसयूआय’ने परीक्षा नियंत्रक कार्यालयासमोर निदर्शने केली.
अभियांत्रिकी विभागाचा पहिल्या सत्राचा निकाल २७ जानेवारी रोजी लागला आहे. यात अनुत्तीर्ण झालेल्या अथवा अपेक्षित गुण न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करण्यासाठी उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतींची मागणी विद्यापीठाकडे केली आहे; गेला सव्वा महिना झाले तरी अद्याप संबंधितांना छायांकित प्रती मिळालेल्या नाहीत. दुसऱ्या सत्रातील परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होत असल्याने विद्यार्थी गोंधळले आहेत. याबाबत ‘लोकमत’ने ‘फोटोकॉपीसाठी विद्यार्थ्यांचे हेलपाटे’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. ‘एनएसयूआय’चे जिल्हाध्यक्ष नीलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील विद्यार्थ्यांनी परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांच्याकडे याबाबत विचारणा केली.
विद्यार्थ्यांना तत्काळ छायांकित प्रती द्याव्यात व ज्यांच्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यादव यांनी केली. यावेळी युवक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक थोरात, उदय पोवार, पार्थ मुंडे, रोहित पाटील, सुशांत चव्हाण, विशाल घोरपडे, विक्रांत जाधव, प्रथमेश तेली, आदी विद्यार्थी उपस्थित होते.
तुम्हीच खुर्चीवर बसा!
विद्यार्थ्यांची कैफियत मांडण्यासाठी गेलेल्या ‘एनएसयूआय’चे नीलेश यादव यांना महेश काकडे यांनी धारेवर धरले. ‘छायांकित प्रती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. वेगळेच वाटत असेल तर तुम्हीच या खुर्चीवर बसा,’ अशी तंबी दिल्याने विद्यार्थ्यांनी कुलगुरूंकडे जाण्याचा निर्णय घेतला.