अवैध धार्मिक स्थळांवरील कारवाई तीन टप्प्यांत
By admin | Published: May 1, 2016 12:57 AM2016-05-01T00:57:13+5:302016-05-01T00:57:13+5:30
नोव्हेंबरअखेर अंमलबजावणी : महिनाअखेरीस नियमितीकरणावर निर्णय
कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने तीन टप्पे तयार केले असून, पहिल्या टप्प्यात ३१७ पैकी १८० धार्मिक स्थळे नियमित केली जाण्याची शक्यता आहे, तर उर्वरित १३७ धार्मिक स्थळांचे स्थलांतर किंवा जमीनदोस्त करण्याची कारवाई केली जाऊ शकते. ही कारवाई नोव्हेंबरअखेर पूर्ण करायची आहे.
कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहर हद्दीतील अनधिकृत धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करून त्याची यादी वृत्तपत्रातून जाहीर केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांना अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याबाबत न्यायालयाने मुदत दिली आहे. त्यामुळे अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत हरकती मागवून सुनावणीही घेतली होती. मनपा विभागीय कार्यालयाद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात ३१७ धार्मिक स्थळे ही अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले; परंतु सर्वच धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापकाकडून हरकती घेतल्या होत्या. ती पाडू नयेत, ही बांधकामे नियमित करावीत, अशी मागणी सुनावणीवेळी केली आहे. ही सुनावणी पूर्ण झाली आहे.
धार्मिक स्थळांबाबतच्या हरकती, त्यावरील सुनावणी आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती विचारात घेता ३१७ पैकी १८० धार्मिक स्थळे ही नियमित होण्यासारखी असल्याचे मनपा प्रशासनाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे अशा धार्मिक स्थळांचेही पुन्हा सर्वेक्षण झाले आहे. तशी यादीही तयार केली आहे. ३१ मे पूर्वी ही बांधकामे नियमित करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात म्हणजे आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत जी धार्मिक स्थळे स्थलांतर करावी लागणार आहेत, त्यावर निर्णय घेऊन ती स्थलांतर केली जाणार आहेत. तिसऱ्या टप्प्यात नोव्हेंबरअखेरपर्यंत अनधिकृत धार्मिक स्थळे नियमित करता येणे अशक्य आहे, शिवाय त्यांना पर्यायी जागेत स्थलांतर करणेही अशक्य आहे, ती बांधकामे पाडण्याची कारवाई पूर्ण करावी लागणार आहे. महानगरपालिका प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेतला आहे.
अवैध धार्मिक स्थळांवरील या कारवाईबाबत पोलिस खात्याशीही समन्वय ठेवून पुढील कारवाई करण्याचे निर्णय होतील, असे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)