नदी प्रदूषित घटकांवर कारवाई करा अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:24 AM2021-04-16T04:24:21+5:302021-04-16T04:24:21+5:30
कुरुंदवाड : प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षामुळे पंचगंगा नदी वारंवार प्रदूषित होत आहे. त्यामुळे नदी प्रदूषित करून नागरिकांच्या जिवाशी खेळ ...
कुरुंदवाड : प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षामुळे पंचगंगा नदी वारंवार प्रदूषित होत आहे. त्यामुळे नदी प्रदूषित करून नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जबाबदार अधिकारी आणि नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर जिल्हाधिकारी यांनी तातडीने कारवाई करावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील व विश्वास बालीघाटे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. त्यामुळे नदी प्रदूषणावरून पंचगंगा काठ धुमसण्याची शक्यता आहे.
इचलकरंजी शहरातील मलयुक्त सांडपाणी व औद्योगिक कारखान्याचे रसायनयुक्त सांडपाणी विनाप्रक्रिया ओढ्याद्वारे नदीपात्रात सोडले जात असल्याने पंचगंगा नदी प्रदूषित होत आहे. नदी प्रदूषण विरोधात स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी, नागरिकांना घेऊन आंदोलन केले की, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर जुजबी कारवाई करतात. त्यामुळे काही दिवस उलटले की पुन्हा पाणी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर येतो.
प्रदूषित पाण्यामुळे शिरोळ तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती नापिक बनत आहे. शिवाय नागरिकांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होत असून, अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.
नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे; मात्र कडक कारवाई करण्यात अधिकारीच निष्क्रिय ठरत असल्याने नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत आहे. त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी लक्ष घालून नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर व कारवाई करण्यात हलगर्जी दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊन कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नदी प्रदूषणाच्या प्रश्नावरून वाद गाजण्याची शक्यता आहे.