‘गोकुळ’च्या सुविधांचा लाभ घ्या
By admin | Published: September 20, 2015 11:51 PM2015-09-20T23:51:51+5:302015-09-20T23:58:14+5:30
विश्वास पाटील : शिनोळीत संपर्क मेळावा; ५४ कोटी ७३ लाखांचे वाटप होणार
चंदगड : गोकुळ दूध संघाला उच्चप्रतीचे दूध पाठविण्यात चंदगड तालुका अव्वल आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला दर वाढविण्याची आमची इच्छा आहे. मात्र, बाजारभावाला अनुसरून दुधाच्या किमती ठरवाव्या लागतात. गोकुळच्या सेवा सुविधांचा वापर करून दूध संस्थांनी चंदगड तालुक्यातून जास्तीत जास्त दुधाचा पुरवठा करावा. संघाचे पशुखाद्य वापरावे. येत्या दिवाळीपर्यंत ठेवीवरील व्याज, डिव्हीडंड बोनसच्या माध्यमातून एकूण ५४ कोटी ७३ लाख रुपये दूध उत्पादकांना देणार आहे, अशी माहिती जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली.
शिनोळी (ता. चंदगड) येथे चंदगड तालुक्यातील प्राथमिक दूध संस्थांच्या संपर्क मेळाव्यात ते बोलत होते.
संचालक दीपक पाटील यांनी प्रास्ताविकात तालुक्यातून दीड लाख लिटर दूध उत्पादनाचे उद्दिष्ट असून, दूध उत्पादकांनी गोकुळच्या सेवांचा वापर करावा, असे आवाहन केले. प्रारंभी तालुक्यातील प्राथमिक दूध संस्थातर्फे नरसिंग पाटील, प्रा. एस. एन. राजगोळकर यांच्याहस्ते अध्यक्ष पाटील यांचा सत्कार झाला.
याप्रसंगी संकलन, पशुसंवर्धन, पशुखाद्य, मिल्को टेस्टर, संगणक, बिल विभाग, आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
यावेळी आप्पाजी राजगोळकर, मारुती पट्टेकर, रामा पाटील, गुंडू नेवगिरे, विजय देसाई, रमेश पाटील, गोपाळ कांबळे, आप्पाजी वर्पे, सुभाष देवण, आदी संस्था प्रतिनिधींनी चर्चेत भाग घेतला.
यावेळी संचालक अरुण नरके, रवींद्र आपटे, विलास कांबळे, विश्वास जाधव, बाळासाहेब खाडे, रामराजे कुपेकर, उदय पाटील, अंबरिश घाटगे, श्रीमती जयश्री चुयेकर, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, माजी संचालक नामदेव कांबळे उपस्थित होते.
जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या, उत्तम प्रतीचे दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांना यावेळी संचालक मंडळातर्फे बक्षिसे देण्यात आली. संचालक राजेश पाटील यांनी आभार मानले. ( प्रतिनिधी )
वारसांना एक लाखाची मदत
तावरेवाडी येथील दूध शीतकरण केंद्राकडे रोजंदारी कर्मचारी असलेले भिकाजी कांबळे (आसगाव) या कर्मचाऱ्याचा महिन्यापूर्वी आकस्मिक मृत्यू झाला होता.
यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना गोकुळ कर्मचाऱ्यांतर्फे गोळा करण्यात आलेला एक लाखाचा धनादेश अध्यक्ष पाटील यांच्या हस्ते शारदा कांबळे यांना देण्यात आला.