सर्वसामान्यांचीही कामेही घ्या

By admin | Published: December 29, 2014 10:55 PM2014-12-29T22:55:44+5:302014-12-29T23:47:40+5:30

चंद्रकांत पाटील : जिल्हा नियोजन समितीची बैठक; विकासकामांबाबत चर्चा

Take also the work of ordinary people | सर्वसामान्यांचीही कामेही घ्या

सर्वसामान्यांचीही कामेही घ्या

Next

कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीकडे येणाऱ्या निधीतून आमदारांनी सुचविलेली कामे घेण्याला प्राधान्य दिले जाते. मात्र, यंदापासून सर्वसामान्यांनीही सुचविलेली कामे समितीच्या निधीतून केली जाणार आहेत. यासाठी सामान्यांनी कामे सुचवावीत, असे आवाहन मी स्वत: लवकरच पत्रकार परिषद घेऊन करणार आहे, अशी माहिती सहकार व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
जिल्हा नियोजन समितीची आज, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना देताना ते बोलत होते. जिल्हाधिकारी राजाराम माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माने व सुभेदार यांच्याशी मंत्री पाटील यांनी जिल्हा विकास नियोजन आराखड्यात समावेश करावयाच्या विविध कामांसंबंधी चर्चा केली. नियोजन समितीतून आमदारांनी आणि सदस्यांनी सुचविलेली कामे करण्याला प्राधान्य दिले जाते. यामुळे गटा-तटातून काही कामे होत नाहीत, याकडे मंत्री पाटील यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, अनेक विकासकामांचा थेट संबंध सामान्य नागरिकांशी येत असतो. त्यामुळे यंदापासून केवळ आमदारांनी सुचविलेली कामे न घेता सामान्यांनी सांगितलेलीही कामे घ्यावयाची आहेत.
शाळांची अपूर्ण संरक्षण भिंत बांधणे, पूर्णपणे नव्याने भिंत बांधणे, रस्ता तयार करणे, रस्त्याची कामे सुचविण्याचे आवाहन जिल्ह्यातील लोकांना करणार आहे. शासनाच्या विविध विकासकामांसाठी नियोजन समितीकडे येणारा सर्व निधी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. मार्च जवळ आल्यानंतरच खर्च करण्यासाठी धडपडण्याऐवजी आतापासून नियोजन करावे. डोंगरी व सधन तालुक्यांना निधी मिळायला हवा. विकासकामे सुचविण्यात सर्वसामान्यांचा सहभागही महत्त्वाचा आहे. सध्या निवडल्या जाणाऱ्या कामांत सामान्यांनी सुचविलेल्या कामांचा समावेश होत नाही.
यावेळी जिल्हाधिकारी माने यांनी, नावीन्यपूर्ण योजना राबविण्यासाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठांची परवानगी आवश्यक असल्याचे सांगितले. बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे यांच्यासह सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

डोंगरी, सधन तालुक्यांना निधी देणार
विकासकामांचा संबंध थेट नागरिकांशी येतो, त्यामुळे गट-तट न पाहता आमदारांबरोबर सामान्य नागरिकांनी सुचविलेल्या कामांना निधी द्या.
शाळांची व रस्त्यांची कामे सुचविण्यासाठी आवाहन
नियोजन समितीकडील निधीचे योग्य नियोजन करावे.

Web Title: Take also the work of ordinary people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.