टोल आंदोलकांवरील खटले मागे घेऊ : मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 01:16 AM2019-06-14T01:16:28+5:302019-06-14T01:17:38+5:30
‘कोल्हापूर शहरात झालेल्या टोल आंदोलनात पोलिसांनी दाखल केलेले खटले मागे घेण्याची मी घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी का झाली नाही, हे मी एकदा तपासून घेतो. माझ्या लक्षात आहे, मी करून घेतो,’ अशा शब्दांत गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल आंदोलकांवरील खटले मागे घेण्याचे
कोल्हापूर : ‘कोल्हापूर शहरात झालेल्या टोल आंदोलनात पोलिसांनी दाखल केलेले खटले मागे घेण्याची मी घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी का झाली नाही, हे मी एकदा तपासून घेतो. माझ्या लक्षात आहे, मी करून घेतो,’ अशा शब्दांत गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल आंदोलकांवरील खटले मागे घेण्याचे पुन्हा एकदा आश्वासन दिले.
टोल आंदोलनातील कार्यकर्ते दिलीप देसाई, रमेश मोरे, स्वप्निल पार्टे, अशोक पोवार, किसन कल्याणकर अशा पाचजणांनी गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची उजळाईवाडी विमानतळावर भेट घेतली आणि खटले मागे घेण्याबाबत निवेदन दिले. देसाई यांनी विमानतळावर भेटण्याची विनंती केली होती. त्यानुसार कागलला कार्यक्रमास जाण्यापूर्वी दोन मिनिटे मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा केली.
टोल आंदोलकांवरील खटले काढून टाकण्याचे आश्वासन आपण दिले होते; परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही. वारंवार आंदोलकांना न्यायालयात येरझाऱ्या माराव्या लागत आहेत. कार्यकर्त्यांची त्यामुळे मोठी कुचंबणा होत आहे. तेव्हा आपण दिलेल्या आश्वासनानुसार कार्यवाही केली जावी, अशी अपेक्षा दिलीप देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखविली.
त्याचवेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनीही साहेब करून घ्यायला लागतंय, या खटल्यात मलाही दंड झाला होता, याची माहिती दिली. त्यावेळी ‘माझ्या लक्षात आहे. खटले मागे घेण्याची अंमलबजावणी का झाली नाही हे मी तपासून घेतो आणि संबंधितांना तशा सूचना देतो’, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह टोल विरोधात झालेल्या आंदोलनातील नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
वीजदरप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना टोलवले
प्रलंबित प्रश्न : निवेदन घेण्यासही टाळाटाळ
कोल्हापूर : कागल दौºयावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज दरवाढीसह पॉवर फॅक्टर पेनल्टीसंदर्भातील प्रलंबित प्रश्नात लक्ष घालावे म्हणून विनंती करायला गेलेल्या कोल्हापुरातील उद्योजकांची साधी दखलही घेतली नाही. निवेदन स्वीकारतो, चर्चा करतो म्हणून भेटीचे ठिकाण व वेळही दिली; पण प्रत्यक्षात निवेदनही स्वीकारले नाही. मुख्यमंत्र्यांकडून टोलवाटोलवी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर उद्योजकांनी स्वीय साहाय्यकांकडे निवेदनाची प्रत देऊन भावना पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या टोलवाटोलवीबद्दल उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली.
उद्योजकांनी आधी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून, दौºयात भेट घेण्याची परवानगीही घेतली होती. त्यानुसार सुरुवातीला विमानतळावर भेट घेण्याचे ठरले; पण विमान उशिरा येणार असल्याने कागलमध्ये पुतळा अनावरणाच्या ठिकाणी माळ बंगल्यावरच १५ मिनिटे चर्चा करू असे ठरले. त्याप्रमाणे आयआयएफचे अध्यक्ष सुमित चौगुले, कोल्हापूर चेंबर्स आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, ‘गोशिमा’चे अध्यक्ष लक्ष्मीदास पटेल, ‘स्मॅक’चे अध्यक्ष राजू पाटील, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अतुल आरवाडे या उद्योजकांच्या प्रतिनिधींनी दुपारी एक वाजता माळ बंगला गाठला. तेथे आल्यावर भेटीबद्दल विचारले असता, मेळाव्याचा कार्यक्रम झाल्यानंतर निवेदन स्वीकारू, असा निरोप स्वीय साहाय्यकाकडून आला. त्याप्रमाणे जयसिंगराव घाटगे विद्यालयाच्या पटांगणावर झालेल्या मेळाव्याच्या ठिकाणी सर्व उद्योजक पोहोचले. भेट घेण्याचा प्रयत्न केल्यावर कार्यक्रम संपल्यावर बघू, असे सांगण्यात आले. कार्यक्रम संपल्या संपल्या लगेच मुख्यमंत्री बाहेर पडून गाडीत बसत असताना उद्योजकांनी गाठल्यावर मुंबईत या, निवांत चर्चा करू, असे सांगून ते रेठरे बुद्रुकच्या कार्यक्रमाला निघून गेले.