‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:26 AM2020-12-31T04:26:13+5:302020-12-31T04:26:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कुरुंदवाड : पंचगंगा नदी प्रदूषणाकडे दुर्लक्ष करणार्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर व प्रदूषण करणार्या घटकांवर त्वरित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरुंदवाड : पंचगंगा नदी प्रदूषणाकडे दुर्लक्ष करणार्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर व प्रदूषण करणार्या घटकांवर त्वरित गुन्हा दाखल करावा, नदी प्रदूषणामुळे संतप्त भावनेतून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, यासाठी स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन दिले.
दरम्यान, जिल्हाधिकारी देसाई यांनी, नदीत प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्यात येईल तसेच संघटनेच्या कार्यकर्त्यांवरील दाखल गन्ह्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांशी बोलून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
गत आठवड्यात पंचगंगा नदी प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी आलेले प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरबड यांना संतप्त स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी तेरवाड बंधाऱ्यावरच दोरखंडने बांधून ठेवले होते. त्यामुळे अधिकारी हरबड यांनी स्वाभिमानी युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील (रा. हेरवाड, ता. शिरोळ), विश्वास बालीघाटे (रा. शिरढोण) याच्यासह अज्ञात पाचजणांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कुरुंदवाड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला होता.
सार्वजनिक न्याय हक्कासाठी आंदोलन करणार्या स्वाभिमानीच्या या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि नदी प्रदूषण करणार्या घटकांवर तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, मिलिंद साखरपे, अकिवाट सरपंच विशाल चौगुले, बंडू उमडाळे, संजय अपराज, शैलेश चौगुले यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो -
तेरवाड (ता. शिरोळ) बंधाऱ्यावरील आंदोलनप्रश्नी स्वाभिमानी कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन दिले.