आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांवरील गुन्हे मागे घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:52 AM2020-12-11T04:52:57+5:302020-12-11T04:52:57+5:30
उत्तूर : आंबेओहळ प्रकल्प (ता. आजरा) येथे दडपशाहीच्या मार्गाने दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेऊन धरणग्रस्तांचे पुनर्वसन करा, मगच ...
उत्तूर : आंबेओहळ प्रकल्प (ता. आजरा) येथे दडपशाहीच्या मार्गाने दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेऊन धरणग्रस्तांचे पुनर्वसन करा, मगच धरण चालू करा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना निवेदनातून देण्यात आला आहे.
गेल्या २० वर्षांपासून रखडलेल्या आंबेओहळ प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने वेळोवेळी प्रयत्न केले असून, प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या नेतृत्वाखाली प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र प्रकल्पग्रस्तांच्या अजूनही मागण्या मान्य झालेल्या नाहीत. जोपर्यंत शेवटच्या माणसाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत यासाठी लढण्याची भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. संपूर्ण पुनर्वसन झाल्याशिवाय धरणाचे काम चालू देणार नाही.
पाटबंधारे विभागातर्फे जबरदस्तीने काम सुरू केल्याने धरणग्रस्तांनी आत्मक्लेश आंदोलन केले. आंदोलकांवर खोटे खटले दाखल केले. धरणग्रस्तांवरील खटले त्वरित मागे घेण्यात यावेत.
भाजप उपाध्यक्ष अशोक चराटी, तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार, सरचिटणीस अतिशकुमार देसाई, संतोष बेलवाडे, राजू पोतनीस, वैभव नार्वेकर, रामदास मिसाळ, भास्कर भाईगडे यांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना निवेदन दिले.
-----------------------
फोटो ओळी : गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना निवेदन देताना आजरा भाजप तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार. शेजारी भाजप उपाध्यक्ष अशोक चराटी, राजू पोतनीस, अतिशकुमार देसाई, राजू देशपांडे, आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०९१२२०२०-गड-०१