नोकर भरतीवरील बंदी मागे घ्या
By admin | Published: November 12, 2016 01:00 AM2016-11-12T01:00:41+5:302016-11-12T01:00:41+5:30
स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची मागणी : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
कोल्हापूर : सरकारने लाखो रिक्त जागांचा अनुशेष शिल्लक असताना पुन्हा ९० हजार जागांच्या भरतीवर बंदी घातली आहे, तो निर्णय मागे घ्यावा, या प्रमुख मागणीसह स्पर्धा परीक्षांमधील अधिकारी पदांमध्ये करण्यात आलेली कपात मागे घेण्यात यावी, प्रतीक्षा यादीची योग्य अंमलबजावणी व्हावी, रिक्त पदे भरण्याबाबत कायदा करावा, अशा विविध मागण्यांसाठी शुक्रवारी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघर्ष समितीतर्फे काढण्यात आलेल्या या मोर्चाचे नेतृत्व गिरीश फोंडे यांनी केले. मोर्चाचा मार्ग दसरा चौक, लक्ष्मीपुरी, फोर्ड कॉर्नर, व्हीनस कॉर्नर, बसंत बहार रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय असा राहिला. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘नोकर भरती झालीच पाहिजे’, ‘नोकरी आमच्या हक्काची... नाही कुणाच्या बापाची’, ‘ नोकरी मागतोय.. भीक नाही,’ आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना निवेदन देण्यात आले.
शिक्षणाच्या खासगीकरणामुळे कर्जे काढून शिक्षण घेतल्यानंतरही युवकांना बेरोजगारीला तोंड द्यावे लागत आहे.
स्पर्धा परीक्षा, एमपीएससी व अन्य परीक्षांद्वारे नोकरी मिळविण्याकडे युवकांचा कल होता; पण महाराष्ट्र सरकारने पोलिस प्रशासन, शिक्षण, समाजकल्याण अशा सर्वच विभागांत नोकरभरती बंदीचा निर्णय जाहीर केला आहे. लाखो रिक्त जागांचा अनुशेष शिल्लक असतानाच पुन्हा ९० हजार जागांवर बंदी हुकूम आणल्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर संकट कोसळले आहे. तरी या सर्व जागा त्वरित भराव्यात. पूर्व परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन द्यावे. सरकारमान्य पदे व रिक्त पदे यावर श्वेतपत्रिका काढावी. शिक्षण विभाग, विद्यापीठांमधील जागा त्वरित भराव्यात.
विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन दिल्याचे मोर्चाचे आयोजक गिरीष फोंडे यांनी सांगितले.
मोर्चात विश्वंभर डवरी, तुकाराम पाटील, अतुल पाटील, दत्तात्रय चव्हाण, संभाजी पाटील, विशाल नलवडे, विनायक पाटील, स्वप्निल पोवार, प्रशांत आंबी यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)