राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर करण्यास बंदी, अवमान होऊ नये, याची घ्या दक्षता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 11:27 AM2018-08-11T11:27:22+5:302018-08-11T11:31:26+5:30
स्वातंत्र्यदिनी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापरावर शासनाने बंदी घातली आहे. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा, तसेच त्याचा अवमान होऊ नये, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले आहे.
कोल्हापूर : स्वातंत्र्यदिनी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापरावर शासनाने बंदी घातली आहे. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा, तसेच त्याचा अवमान होऊ नये, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले आहे.
राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. दरवर्षी स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन व इतर राष्ट्रीय कार्यक्रम तसेच महत्त्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी तसेच नागरिकांकडून कागद व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो.
हा कार्यक्रम पार पाडल्यानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यांवर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात. असे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वजसंहितेच्या कलम १.२ ते १.५ मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत तरतूद केलेली आहे.
प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदीचे पालन करावे. कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये. राष्ट्रध्वजाचा अवमान केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे, असे आवाहन केले आहे.